भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मँगेनीज खाणींमध्ये चीनच्या मशीनची एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 03:19 PM2018-08-29T15:19:34+5:302018-08-29T15:22:37+5:30
मँगेनीजच्या अधिकाधिक उत्खननासाठी मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड (मॉईल) कंपनी चीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील चिखला भूमिगत मँगेनीज खाणीत व्हर्टीकल मशीन दाखल झाली असून यामुळे कामगारांत धडकी भरली आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मँगेनीजच्या अधिकाधिक उत्खननासाठी मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड (मॉईल) कंपनी चीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील चिखला भूमिगत मँगेनीज खाणीत व्हर्टीकल मशीन दाखल झाली असून यामुळे कामगारांत धडकी भरली आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातील दहा मॉईल कंपनीतील सुमारे आठ हजार कामगारांना याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात चिखला व डोंगरी बु. येथे ब्रिटीशकालीन दोन मँगेनीज खाणी आहेत. तर मध्यप्रदेशच्या बालाघाट आणि इतर राज्यात दहा मँगेनीज खाणी सध्या आहेत. येथे हजारो कामगार कार्यरत आहेत. चिखला येथे भूमिगत तर डोंगरी बु. येथे खुली खाण आहेत. चिखला खाणीत चीन येथील नवीन व्हर्टीकल मशीन नुकतीच आणण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यापासून ही मशीन कार्यान्वित केली जाणार आहे. मॅग्नीज खाणीतून मँगेनीज काढण्याचे कामही या मशीननेच येथे येत्या काही दिवसापासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. डोंगरी बु., तिरोडी तथा अन्य दहा मँगेनीज खाणीत चीनच्या मशीनचा वापर केला जाणार असून तशी तयार मॉईल प्रशासनाने सुरु केली आहे.
दहा मॉईल कंपनीतील सुमारे आठ हजार कामगारांचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राष्ट्रीय मजदूर संघाने मँगेनीज ओर इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय मजदूर मंचच्या तुमसर शाखेने कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केली आहे. मॉईल प्रशासन याबाबत कोणतीच माहिती देण्यास तयार नाही. सध्या मॉईलचा कामगारात अस्वस्थता दिसत आहे. चीनच्या मशीनची एंट्री वरिष्ठ स्तरावरून करण्यात आली असल्याने स्थानिक अधिकारी मौन पाळून आहेत.
चीनच्या आधुनिक मशीन प्रत्येक मॉईलमध्ये दाखल झाल्या असून त्यांची सध्या स्थापनेची कामे सुरु आहेत. आधुनिक मशीनमुळे हजारो कामगार बेरोजगारीची शक्यता आहे. केंद्र शासनाने येथे दखल घ्यावी. कामागर संघटना विरोध करणार आहे.
-हरिहर मलीक
अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर मंच, तुमसर
चिखला मॉईलमध्ये चीनची एक मशीन आली आहे. परंतु कामगारांना काहीच फरक पडणार नाही. मॉईल अत्याधुनिक करणे हा त्या मागचे कारण आहे. केंद्रस्तरावर हा निर्णय घेतला जातो. स्थानिक पातळीवर काहीच होत नाही.
-राजेश भट्टाचार्य
माईल प्रतिनिधी, डोंगरी व चिखला मॉईल
कोट
अत्याधुनिक चीन येथून मशीन आल्यावर निश्चितच कामगारांवर बेरोजागरीचे संकट कोसळणार आहे. परंतु हे खपवून घेतले जाणार नाही. कामगारांची गच्छंती झाल्यास त्यास तीव्र विरोध करण्यात येईल.
-डॉ.पंकज कारेमोरे
युवा काँग्रेस नेते, तुमसर