उन्हाळी धान हंगामासाठी चुलबंद खाेरे हिरवेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:24 AM2021-01-01T04:24:20+5:302021-01-01T04:24:20+5:30
मुखरु बागडे भंडारा : खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर पुन्हा नव्या आशेने शेतकरी उन्हाळी धानाच्या तयारीला लागले आहे. लाखनी तालुक्यातील ...
मुखरु बागडे
भंडारा : खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर पुन्हा नव्या आशेने शेतकरी उन्हाळी धानाच्या तयारीला लागले आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंद खाेरे धान नर्सरीने हिरवेगार झाले असून, नववर्षात राेवणीला प्रारंभ हाेणार आहे. कडाक्याच्या थंडीतही पऱ्हे सुस्थितीत असून मऱ्हेगाव येथील वीरेंद्र मदनकर या शेतकऱ्याने पऱ्हे हिरवे ठेवण्यासाठी नवी शक्कल लढविली आहे.
पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १२०० हेक्टरवर उन्हाळी धानाचे नियाेजन करण्यात आले आहे. उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांना परवडण्यासारखा असताे. खरीपापेक्षा अधिक उत्पन्न येते. मात्र नर्सरीतील पऱ्हे कडाक्याच्या थंडीत जगविणे तसे कठीणच असते. थंडीने उन्हाळी धानाचे पऱ्हे अक्षरश: मरणासन्न अवस्थेत असतात. बुरशीनाशकापासून तर वाढ खुंटण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. बियाणे दुप्पट वापरावे लागतात. अनेक ठिकाणी नर्सरीला आच्छादन करावे लागते. किमान ३० ते ४० दिवसाच्या कालावधीनंतर पऱ्हे राेवणीला तयार हाेतात. परंतु प्रयाेगशील शेतकऱ्यानी चुलबंद खाेऱ्यात चिखलटी पद्धतीने पऱ्हे टाकले. या पऱ्हांची वाढ आता जाेमाने हाेत आहे.
सध्या चुलबंद खाेऱ्यात नर्सरीमुळे हिरवेगार गालिचे पसरविल्याचे चित्र दिसून येते. सकाळी काेवळ्या उन्हात धान पऱ्हे मन माेहून टाकतात. धानाच्या पानावरील दवबिंदू आकर्षित करून घेतात.
बाॅक्स
चिखलाटी पद्धत ठरली फायद्याची
लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील शेतकरी वीरेंद्र मदनकर यांचा चिखलाटी पद्धतीचा प्रयाेग सध्या चांगलाच फायद्याचा ठरत आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी आपले धान पऱ्हे जगविले आहे. या पद्धतीत जाेखीम आहे. परंतु जुन्या शास्त्राला नवा आयाम देत उन्हाळी धानाची नर्सरी हिरवीगार दिसत आहे. मकरसंक्रांतीच्या पर्वात चुलबंद खाेऱ्यात राेवणीला सुरुवात हाेईल.
काेट
सामूहिक नर्सरीचा प्रयाेग पहिल्या टप्प्यात बरा वाटताे. यातून श्रम व पैशाची बचत हाेते. एकमेकांच्या सहकार्यातून उन्नत शेतीचा मार्ग सापडताे. शेतकऱ्यांनी सामूहिक नर्सरी प्रयाेग करणे गरजेचे झाले आहे.
- पद्माकर गिदमारे,
तालुका कृषी अधिकारी, लाखनी