सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात नागरिक मास्क फ्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:59+5:302021-05-27T04:36:59+5:30

चुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असताना सिहोरा परिसरातील नागरिक मास्क फ्री फिरत ...

Citizen Mask Free in rural areas of Sihora area | सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात नागरिक मास्क फ्री

सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात नागरिक मास्क फ्री

Next

चुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असताना सिहोरा परिसरातील नागरिक मास्क फ्री फिरत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक सर्वसामान्य जीवन जगत असल्याचे दिसून येत आहेत. गावात सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन सुरु करण्यात आले आहे. गावात सोशल डिस्टन्सिंगचे पालन हद्दपार झाले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरूच आहेत. या संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी शासनाच्या उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. कोविड सेंटर उभारण्यासाठी बांधणी करण्यात येत आहे. शासन लॉकडाऊनचा कालावधी वाढवीत आहे. परंतु शासनाच्या या उपाययोजनेत सिहोरा परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक अपवाद ठरत आहेत. ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाने एप्रिल महिन्यात शिरकाव केल्यानंतर अनेकांना कवेत घेतले होते. या महिन्यात नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले होते. गावात सार्वजनिक कार्यक्रमांवर नागरिकांनी खुद्द बंदी घातली होती. ८ - १० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडण्यात आले. धार्मिक कार्यक्रम बंद करण्यात आले होते. परंतु मे महिन्यात या सर्व नियमांना बगल देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात असणारी कोरोना संसर्ग आजाराची भीती आता दूर होत आहे. गावातील नागरिकांनी स्वतःला मास्क फ्री केले आहे. गावात खासगी व सार्वजनिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. कार्यक्रमात गर्दी असतानासुध्दा नागरिक बिनधास्त वावरत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची भीती नागरिकांनी मनातून काढली आहे. गेल्या महिन्यात लसीकरण करण्याची ओरड गावात काही नागरिकांत होती. परंतु लसीकरणासंदर्भात आता कुणी बोलायला तयार नाही. कुणी विचारणा करीत नाही. गावात अन्य आजाराने नागरिक ग्रस्त नसल्याने सर्वसामान्य जीवन जगत आहेत.

ग्रामीण भागात खरीप हंगामातील शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेतशिवारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताच येत नाही. यामुळे महिला, पुरुष मजुरांमध्ये भीती नाही. गावात मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे, नियमांचे पालन करणे, यांना बगल देण्यात आली आहे. काही जागरूक नागरिक नियमांचे पालन करीत असले तरी त्यांच्याकडे अन्य नागरिक भिरभिरत्या नजरेने पाहात आहेत. सिहोरा गावात नियमांचे पालन करण्यात येत आहे. या गावात मुख्य बाजारपेठ असल्याने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची मंजुरी मिळाली आहे. गावात या वेळेच्या कालावधीत ४७ गावातील नागरिक हजेरी लावत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव गावात पसरण्याची भीती असल्याने नागरिक व व्यावसायिक नियमांचे पालन करीत आहेत.

बॉक्स

दवाखान्यातील गर्दी ओसरली

सिहोरा परिसरातील खासगी व शासकीय रुग्णालयातील गर्दी ओसरली आहे. रुग्णांच्या ओपीडीत कमालीची घसरण झाली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी नागरिक धाव घेत आहेत. एप्रिल महिन्यात कुणीही जात नव्हते. नागरिकांच्या मनात भलतीच भीती निर्माण झाली होती. ती आता नाहीशी झाली आहे. परंतु लसीकरणासंदर्भात कुणी विचारणा करीत नाही. खासगी दवाखान्यात अशीच स्थिती आहे. दवाखाने रिकामे असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात चित्र सामान्य असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Citizen Mask Free in rural areas of Sihora area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.