वृक्ष लागवडीसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
By admin | Published: June 21, 2017 12:30 AM2017-06-21T00:30:11+5:302017-06-21T00:30:11+5:30
प्रदूषणामुळे निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. १ ते ७ जुलैपर्यंत आयोजित केलेल्या वृक्ष लागवड सप्ताहात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेऊन...
नाना पटोले : १ ते ७ जुलैपर्यंत सप्ताहचे आयोजन, पीक देणाऱ्या वृक्षांवर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रदूषणामुळे निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. १ ते ७ जुलैपर्यंत आयोजित केलेल्या वृक्ष लागवड सप्ताहात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेऊन एक व्यक्त एक झाड लावून निसर्ग, पर्यावरणाचे जतन व संरक्षण करावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.
राष्ट्रीय वननिती १९८८ मधील धोरणानुसार एकुण भौगिलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वनीकरण व वृक्षाच्छादन असणे आवश्यक असून महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतशील राज्य असून राज्यातील ३० हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ६१.३५ लाख हेक्टर म्हणजे २० टक्के इतकी जमीन वृच्छादित आहे. परंतु विविध कारणांमुळे वृक्षतोड तसेच कृत्रिम व नैसर्गिक वनवे, यामुळे घनदाट अरण्य ओसाड पडली असून जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच विविध प्रकारच्या घातक प्रदूषणामुळे जागतिक तापमानात वाढ झाली असून पर्यावरणीय बदलामुळे नैसर्गिक बदल झाल्याने अल्प व अनियमित पर्यन्यवृष्टी तर कधी ओला, कोरडा दुष्काळ पडत असतो. या विपरीत परिणाम वनस्पतीसृष्टी व प्राणी सृष्टीवर होऊन पीक उत्पादनात घट येत असते. सजीव प्राण्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असतो. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून याबाबत बुद्धीवंत, प्रज्ञावंत, अभ्यासकांसह नागरिकांनी सम्यक विचार करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर यासाठी संबंधित यंत्रेणेने नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी, वनस्पती, जैवविविधता, दुर्मिळ वनसंपदा, औषधी वनस्पती यांचे रक्षण, संरक्षण आणि संवर्धन याबाबत जनजागृती करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करून वृक्ष लागवडीचे महत्व समजावून सांगणे गरजेचे आहे.
मागील वर्षी राज्यात सुमारे २ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या कार्यक्रम राबविण्यात आला. आता येणाऱ्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठावयाचे असून या कार्यक्रमात नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे महत्वाचे असून प्रत्येक कार्यालयाच्या सभोवताल, शाळा महाविद्यालयांनी विद्यालय परिसरात, ग्रामस्थांनी अंगण परिसरात तर शेतकरी बांधवांनी शेताच्या धुऱ्यावर, पडीत जमीनवर व सर्वांनी रस्त्याच्या कडेला आंबा, पेरू, जांभुळ, सीताफळ, बोर अशा नगदी पीक देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी. प्रत्येक कार्यालय व शाळा महाविद्यालयांनी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे छायाचित्रण करावे व याबाबदचा कृती अहवाल दर्शनार्थासाठी जपून ठेवावयाची काळजी घ्यावी. निसर्ग पर्यावरणाचे संतुल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.