दूषित पाण्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:20 PM2018-12-23T22:20:41+5:302018-12-23T22:21:14+5:30

पाणी हे जीवन आहे. याचा समृद्ध साठा जिथे असतो तिथे वैभवसंपन्नता असते असे म्हटले जाते. मात्र भंडारा या बाबतीत अपवाद ठरत आहे. दात आहेत पण चणे नाही, अशी स्थिती पाणीपुरवठ्याच्या बाबतीत झाली आहे.

Citizen is suffering from contaminated water | दूषित पाण्याने नागरिक त्रस्त

दूषित पाण्याने नागरिक त्रस्त

Next
ठळक मुद्देभंडारेकरांच्या समस्या सुटेना : नवीन योजना कार्यान्वित होण्याला वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडार : पाणी हे जीवन आहे. याचा समृद्ध साठा जिथे असतो तिथे वैभवसंपन्नता असते असे म्हटले जाते. मात्र भंडारा या बाबतीत अपवाद ठरत आहे. दात आहेत पण चणे नाही, अशी स्थिती पाणीपुरवठ्याच्या बाबतीत झाली आहे. विशेष म्हणजे नदीत पाण्याचा मुबलक साठा असतानाही भंडारेकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची सर्वच जबाबदारी पालिका प्रशासनावर आहे. शहरात १० हजारापेक्षा जास्त नळधारक असून ३०० च्या वर सार्वजनिक नळ आहेत. मात्र मागील अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे भंडारेकर त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकांनी नळाद्वारे येणारे पाणी पिणे सोडून दिले आहे. आरोच्या भरवशावर नागरिक आपली तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी स्वस्तपेक्षा महागडे पाणी विकत घेऊन प्रपंच सुरु आहे.
धरणात पाणीसाठा केल्यामुळे वैनगंगा नदीच्या जलस्तरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु नाग नदीचे पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी दूषित झाले आहे. नाग नदीवर शुद्धीकरण संयंत्र निर्मितीचा प्रकल्पही अधांतरी असल्याने ही समस्या कायम आहे. त्यातच मध्यंतरीच्या काळात इकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने नदीपात्रात विळखा घातला होता. दूषित व रासायनिकयुक्त पाण्यामुळे जलचरांनाही मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. पूर्वी वैनगंगा नदी शुद्ध व तेवढीच पारदर्शक म्हणून समजल्या जायची. मात्र धरण पूर्णत्वास गेल्यानंतर व नाग नदीच्या शिरकावामुळे सद्यस्थितीत या नदीत आंघोळ करणेही आरोग्याला निमंत्रण देण्यासारखे ठरत आहे.
दुसरीकडे भंडारा शहरात वैनगंगा नदीपात्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्र असले तरी लोकसंख्येच्या मानाने ते पुरेसे नाही. वाढीव लोकसंख्येनुसार पालिका प्रशासनाने नवीन योजनेचा डिपीआर तयार करून तो मंजुरही करून घेतला आहे. लवकरच नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र या नवीन योजनेसाठी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत भंडारेकरांनी दूषित पाणी प्यावे काय असा सवालही भंडारेकर विचारत आहेत.
मध्यंतरी पालिका प्रशासानाने कमी पैशात २० लिटर पाणी ही योजना कार्यान्वित केली होती. मात्र ते नियोजनही कमी असल्याचे दिसून येते. शहरातील बहुतांश वॉर्डातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून कालबाह्य आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनातील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना लिकेजेस शोधणे जिकरीचे ठरत आहे. लिकेज असल्यावरही त्याची दुरुस्ती करायला बराच कालावधी व निधीही खर्च होत असतो. यावर वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणे नितांत गरजेचे झाले आहे.

Web Title: Citizen is suffering from contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.