गुन्हेगारी थांबविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
By Admin | Published: February 5, 2017 12:20 AM2017-02-05T00:20:05+5:302017-02-05T00:20:05+5:30
समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. तिला थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज व सतर्क आहे. मात्र अनेकांची तक्रार करण्यात येत नाही.
विनिता साहू यांचे आवाहन : पोहरा येथे फिरत्या पोलीस ठाण्यात केल्या नागरिकांनी तक्रारी
भंडारा : समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. तिला थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज व सतर्क आहे. मात्र अनेकांची तक्रार करण्यात येत नाही. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याने अशा अनेक घडामोडी संदर्भात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, ज्यामुळे समाजातील गुन्हेगारी थांबविता येईल. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी व्यक्त केले.
लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोहरा येथे आज ‘फिरते पोलीस ठाणे’ उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्यासह सरपंच जिजा तुमडाम, लाखनीचे तहसीलदार शक्करवार, गटविकास अधिकारी ब्राम्हणकर, जिल्हा परिषद सदस्य विजया शहारे, पं.स. सदस्य संजय डोळस, उपसरपंच जितेंद्र दोनोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता फटे, ग्रामविकास अधिकारी माणिक शेंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अध्यक्ष मोरेश्वर अंबादे, पोलीस पाटील भैय्यालाल मते, गोपीचंद गायधने, सुरेश मते, ओमप्रकाश अंडेल, रविंद्र खेडीकर, पद्माकर गिदमारे, देवीदास गिऱ्हेपुंजे, लाखनीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांच्यासह लाखनी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना साहू यांनी समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्या डोळ्यादेखत घडणाऱ्या घटनेची माहिती पोलिसांना द्यावी व त्यांना शिक्षा होण्याच्या दृष्टीने साक्ष देऊन पुढाकार घ्यावा.
फिरते पोलीस ठाण्यातून ज्या ग्रामीण जनतेला पोलीस ठाण्यापर्यंत पोहचण्यात अडी अडचणी निर्माण होतात त्या या फिरत्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मदत होणार आहे. नागरिकांनी अन्याय होत असल्यास कुणालाही न घाबरता अन्याय पोलिसात तक्रार दाखल कराव्यात असेही यावेळी प्रतिपादन केले.
यावेळी ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी नागरिकांमध्ये पोलिसांच्या प्रती द्वेशभावना व्यक्त करण्यात येते. मात्र पोलिसांना सहकार्य केल्यास त्यांच्या सारखा मित्र अन्य कुठलाही मिळणार नाही. पोलिसांची समाजाप्रती असलेली कर्तव्याची जाण नागरिकांना माहिती व्हावे यासाठी या फिरत्या ठाण्याच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुरु केलेला हा स्तुत्य उपक्रम असून अन्याय अत्याचारांना यातून न्याय देण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रार देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे प्रतिपादन यावेळी केली.
कार्यक्रमादरम्यान तहसीलदार शक्करवार, खंडविकास अधिकारी ब्राम्हणकर आदींनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. दरम्यान एका वृद्धेवर होत असलेल्या अन्यायाबाबत तिने पहिली तक्रार खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्याजवळ नोंदविली. यावेळी साहू यांनी त्यांना आधार देवून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाला पोहरा येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पोहरा ग्रामपंचायतच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)