विजेच्या लपंडावाने कुडेगाव परिसरातील नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:37 AM2021-07-27T04:37:13+5:302021-07-27T04:37:13+5:30
प्राप्त माहितीनुसार कुडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात घरगुती वीज ग्राहकांसह कृषी वीजधारक शेतकरी आहेत. या भागात गत आठवडाभरापासून नियमित विजेचा ...
प्राप्त माहितीनुसार कुडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात घरगुती वीज ग्राहकांसह कृषी वीजधारक शेतकरी आहेत. या भागात गत आठवडाभरापासून नियमित विजेचा लपंडाव सुरू असल्याने अनेक नागरिकांचे खासगी व कृषीविषयक कामांचा खोळंबा होत असल्याचा आरोप केला जात आहे. तथापी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरात सर्वत्र चिखल व दुर्गंधीचे वातावरण दिसून येत आहे. अशातच वीज कंपनी कर्मचा-यांच्या दुर्लक्षाने या परिसरात गत आठवडाभरापासून नियमित दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असतानाच रात्रीच्यासुमारासदेखील वीज बेपत्ता होत असल्याने अनेक वीज ग्राहक कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे.
रात्रीच्यासुमारास गावात विजेअभावी अंधार दिसून येत असल्याने विषारी जीवजंतूंच्या धोक्यासह डासांच्या वाढीमुळे विविध आजारांचे थैमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत वीज कंपनी कर्मचारी व अभियंत्यांना वारंवार माहिती देऊनदेखील आवश्यक उपाययोजना केली जात नसल्याने या भागातील जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन आठवडाभरापासून कुडेगाव परिसरातील विजेच्या लपंडावप्रकरणी दोषी वीज कर्मचारी व अभियंत्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी वीज ग्राहक जनतेतून केली जात आहे.