नागरिकांनी संविधान आत्मसात करावे
By admin | Published: February 2, 2015 11:01 PM2015-02-02T23:01:04+5:302015-02-02T23:01:04+5:30
भारतीय संविधान हे जगातील लिखित असे अद्वितीय संविधान आहे. या संविधानातील मुलभूत हक्क व अधिकारासोबत मूलभूत कर्तव्यसुद्धा समजणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाचे महत्व
भंडारा : भारतीय संविधान हे जगातील लिखित असे अद्वितीय संविधान आहे. या संविधानातील मुलभूत हक्क व अधिकारासोबत मूलभूत कर्तव्यसुद्धा समजणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाचे महत्व जाणणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत संविधान बांधिलकी महोत्सवात उपस्थित मान्यवरांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा व अ.भा. महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्याय मंच यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमुर्ती चौक येथे संविधान बांधिलकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिवताप अधिकारी हर्षल मेश्राम हे होते. विशेष अतिथी म्हणून भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बळीराम सार्वे, अमृत बंसोड, नरेश आंबीलकर, अॅड. संजीव गजभिये, अमृत बन्सोड, प्रा. डॉ. जयश्री सातोरकर, हिवराज उके, भैय्याजी लांबट आदी उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय संविधानाची जडणघडण कशी झाली व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना देण्यात आलेले भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी अत्यंत सामर्थपणे कशी पार पाडली हे महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रा. नरेश आंबीलकर यांनी सांगितले. पंडीत सोमाजी गायकवाड, अॅड. रामदयाल हिरकणे, अश्विनी भिवगडे, महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्याय मंचाच्या अध्यक्षा राज्यलक्ष्मी पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे सरयु डहाट, मअंनिसचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी भारतीय संविधानाचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी हिवताप अधिकारी हर्षल मेश्राम यांनी संविधान हे सर्व ग्रंथापेक्षा जगातील उत्कृष्ठ व लोकहिताचे सर्वश्रेष्ठ असे संविधान आहे याचे नागरिकांनी काटेकोरपणे वाचन व पालन करावे तरच आपल्याला खरी लोकशाही मिळेल असे सांगितले.
या प्रसंगी पॉल चर्च स्कूलचे विद्यार्थी दिव्या गायधने, पुजा बाच्छिल, यशस्वी गजभिये, साक्षी फुलसुंगे, वैशाली डहारे यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. आभार विष्णुदास लोणारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज परदेशी, बसपा फाये, त्रिवेणी वासनिक, राजकुमार दहेकर, मेहमुद अली, कविता लोणारे, कोठीराम पवनकर, सुजाता घेडीचोर, लक्ष्मण भोपे, रहिम तुरक, आशा गजभिये यांनी अथक सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)