नागरिकांनी कायदा, सुव्यवस्था राखावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:09 PM2017-08-25T23:09:23+5:302017-08-25T23:09:47+5:30
सण कोणताही असो शांतता व सद्भावना जोपासल्या गेली पाहिजे. चांगला हेतू ठेवून गणेशोत्सवाची सुरूवात करा.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : सण कोणताही असो शांतता व सद्भावना जोपासल्या गेली पाहिजे. चांगला हेतू ठेवून गणेशोत्सवाची सुरूवात करा. गावाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. गणेशोत्सव असो की बकरी ईद साजरे करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. सण आनंदाने व उत्साहाने साजरे करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.
पोलीस उपविभाग पवनीच्या वतीने गांधी भवनात आयोजित उपविभागीय स्तरावरील जातीय सलोखा व शांतता बैठकीचे अध्यक्षीय मार्गदर्शनात त्या पुढे म्हणाल्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाचे निर्देश पाळणे सर्वांना बंधनकारक आहे. गणेश मंडळांनी डी.जे. चा आवाज ५० डेसीबल पेक्षा अधिक वाढू देऊ नये, कायद्याचे उल्लंघन केल्यास नाईलाजास्तव डी.जे. मालक व मंडळ पदाधिकारी यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येतील. होतकरू युवकांवर गुन्हा दाखल असणे त्यांचे भविष्यासाठी हानीकारक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मिरवणुकीत दारू सेवन करून नाचणाºया विरूद्ध गुन्हा दाखल होवू शकतो त्यामुळे दारूचा अवैध पुरवठा होणार नाही याची काळजी सर्व ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी घ्यावी. मंडळांनी स्वच्छता, वृक्ष लागवड, आरोग्य विषयक शिबिर व समाज प्रबोधन कार्यक्रम यावर भर देवून गणेशोत्सव व ईद शांततेच्या मार्गाने साजरी करावी, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
बैठकीचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांनी प्रास्ताविकात बैठक आयोजनाची भूमिका स्पष्ट करून नागरिकांनी सर्वधर्म समभाव बाळगुण गणेशोत्सव व बकरी ईद साजरे करावे, अशी सद्भावना व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी तहसिलदार गजानन कोकड्डे यांनी मार्गदर्शन केले. गणेश उत्सव, मिरवणुकी दरम्यान उद्भवणारे वाद, पुरस्कारा संदर्भात घेतल्या जाणारे निर्णय, ईको फ्रेंडली गणेशमुर्ती, मूर्ती विसर्जनाचे स्थळ या विविध विषयावर न.प. चे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, मच्छी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष प्र्रकाश पचारे, प्रियदर्शनी गणेश मंडळ पवनीचे प्रतिनिधी रविंद्र रायपुरकर, सुरेश अवसरे, न.प. सदस्य शोभना गौरशेट्टीवार, पोलीस पाटल रूपचंद मेश्राम, दिलीप कांबळे यांनी बैठकीत मुद्दे उपस्थित केले. यासंदर्भात बैठकीच्या प्रमुख मार्गदर्शक जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहु यांनी मार्गदर्शन करून प्रश्न कर्त्यांचे समाधान केले.
बैठकीला पवनी, अड्याळ, लाखांदूर व दिघोरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, गणेश उत्सव मंडळ प्रतिनिधी तंटामुक्त समिती पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी पवनीचे पोलीस निरीक्षक सुनिल ताजने, अड्याळचे सहा. पोलीस निरीक्षक वाय.एस. किचक, लाखांदुरचे पोलीस निरीक्षक डी. डब्ल्यु. मंडलवार, दिघोरीचे सहा. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखडे, गोपनीय विभाग प्रमुख व्ही.बी. गजभिये उपस्थित होते. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभाकर तिक्क्स, संचालन अशोक पारधी तर आभार पोलीस निरीक्षक सुनिल ताजणे यांनी केले.