पोहरा परिसरात अवैध धंदे वाढल्याने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:33 AM2021-02-07T04:33:03+5:302021-02-07T04:33:03+5:30
लाखनी पोलिस ठाण्याचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालावे याकरिता लाखनी १ आणि २ , सालेभाटा , पिंपळगाव/सडक , पोहरा , ...
लाखनी पोलिस ठाण्याचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालावे याकरिता लाखनी १ आणि २ , सालेभाटा , पिंपळगाव/सडक , पोहरा , गडेगाव असे ७ बीट तयार करण्यात आले आहेत. पोहरा बिटात रेंगेपार/कोहळी , चिचटोला , धाबेटेकडी , पोहरा , शिवणी , मोगरा , नान्होरी , दिघोरी , कनेरी/दगडी, पेंढरी आदी गावांचा समावेश आहे. बीट परिसरात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी लखन उईके या पोलिस हवालदाराकडे देण्यात आली आहे. मात्र अनेक गावात देशी व मोहफुलाची दारू वाहतूक व विक्री सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सायंकाळचे सुमारास दारूविक्रेत्यांच्या घराजवळ तळीरामांची जत्रा भरत असल्याने सायंकाळनंतर आवश्यक कामाकरिता महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. सव्वा रुपयास १०० रुपये सट्ट्याचा भाव असल्याने तथा कागदाच्या एका छोट्याशा चिठोऱ्यावर चुकाऱ्याची सोय आणि कसलेही भांडवल वा जोखीम नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांसह महिलाही सट्ट्याच्या विळख्यात ओढल्या जात असल्याने गावाचे स्वास्थ्य बिघडण्याच्या मार्गावर आहे. यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
बॉक्स
सुशिक्षित बेरोजगारांसह महिलाही सट्ट्याच्या विळख्यात
पोहरा बीट परिसरात सायंकाळी दारूविक्रेत्यांच्या घराजवळच तळीरामांची जत्रा भरते. त्यामुळे सायंकाळनंतर आवश्यक कामाकरिता महिलांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. कमी कष्टात व कसलेही भांडवल आणि जोखीम नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांसह महिलाही सट्ट्याच्या विळख्यात ओढल्या जात आहेत.