येदरबुची येथे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:20 AM2019-05-29T01:20:42+5:302019-05-29T01:21:03+5:30
अतिथी देवो भवं असे म्हटले जाते, परंतु दुष्काळात तीव्र पाणीटंचाईच्या रौद्र रुपाने नातेवाईकांनी गावात मागील तीन वर्षापासून येणे बंद केले आहे. गावाच्या मुलींनी माहेराकडे पाठ फिरविल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. पाणीटंचाईमुळे नाते तुटलेले गाव अशी ओळख व प्रसिद्धी तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल येदरबुचीला मिळत आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अतिथी देवो भवं असे म्हटले जाते, परंतु दुष्काळात तीव्र पाणीटंचाईच्या रौद्र रुपाने नातेवाईकांनी गावात मागील तीन वर्षापासून येणे बंद केले आहे. गावाच्या मुलींनी माहेराकडे पाठ फिरविल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. पाणीटंचाईमुळे नाते तुटलेले गाव अशी ओळख व प्रसिद्धी तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल येदरबुचीला मिळत आहे. आदिवासी बांधवांच्या विकासाकरिता शासन घसा कोरडा होतपर्यंत कटीबद्ध असल्याचे सांगते. परंतु वास्तविक परिस्थिती मोठी भयानक असल्याने गावाला भेट दिल्यानंतर प्रत्यय येतो.
तुमसर तालुक्यातील येदरबुची हे गाव १०० टक्के आदिवासी बहुल आहे. गावाची लोकसंख्या १२०० इतकी आहे.
या गावात मागील तीन वर्षापासून दुष्काळसदृष्य स्थिती असून तीव्र पाणीटंचाई सुरु आहे. गावापासून एक ते दीड किमी अंतरावरील शेतशिवारातील विहिरीतून पहाटे तीन पासून पाण्याकरिता महिला पुरुष पाण्याकरिता पायपीट करताना दिसतात.
गावाशेजारी आंतरराज्यीय बावनथडी धरण आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावाला ३० हजार लिटरचा जलकुंभ बांधण्यात आला. मात्र तो आठवड्यातून केवळ एकदाच केवळ १५ हजार लिटरच भरला जातो. दैनंदिन गरज या पाण्याने कशी भागणार याकरिता ग्रामस्थ शेतशिवाराकडे पाण्यासाठी धाव घेताना येथे दिसतात. पहाटे ३ पासून ग्रामस्थांच्या रांगा विहिरीवर लागत आहेत.
विहिरीतील गढूळ पाण्याने तृष्णा भागवावी लागत असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ता अनिल टेकाम यांनी केली.
प्रशासनाच्या नियोजनाअभावी येदरबुी ग्रामस्थांना त्याचा मोठा फटका बसत आहे. गावातील इतर विहिरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. केवळ एका विहिरीवर हे गाव सध्या तहान भागवित आहेत. पाणी मिळविणे येथे मोठे अग्नीदिव्य ठरत आहे. धरण उशाला व कोरड घशाला अशी स्थिती येथे दिसत आहे.
पाणीटंचाईमुळे नातलगांनी फिरविली पाठ
येदरबुची येथे मागील तीन ते चार वर्षापासून तीव्र पाणी टंचाई आहे. येथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नातेवाईकांनी या गावाकडे पाठ फिरविली आहे. मागील तीन वर्षापासून येदरबुची येथे पाहुणेमंडळी येत नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. येथील महिला राजलिला टेकाम, भीमाबाई कुंभारे यांनी मोठ्या जळजळीत प्रतिक्रिया दिल्या. गावातील मुली माहेरी येत नाही, तर येथील बहिणीकडे भाऊ व बहिणी दुष्काळामुळे आमच्या गावाला येत नाही.
प्रशासनाचे तेच उत्तर
येदरबुची येथील पाणीटंचाईबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही. ग्रामस्थांबरोबर जनावरेही गढूळ पाणी पीत आहेत. पाण्याअभावी घरकुलांचे बांधकाम येथे थांबले आहे. येथील स्थानिक प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवणार असल्याचे ठराविक उत्तरे देत आहे.