लाखांदूर शहराला वादळाचा जोरदार तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:36 AM2021-05-09T04:36:56+5:302021-05-09T04:36:56+5:30
शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळाला सुरुवात झाली. काही वेळातच जोरदार पाऊसही सुरू झाला व ...
शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळाला सुरुवात झाली. काही वेळातच जोरदार पाऊसही सुरू झाला व अवकाळी पावसाने हजेरी लावली. स्थानिक जिरोबा परिसरातील अनिल राखडे व माधव खरकाटे यांचे घर या वादळात पूर्णत: उद्ध्वस्त झाले. घरातील संसारोपयोगी साहित्यासह टिव्ही, फ्रिज, फॅन, कुलर व अन्य काही ईलेक्ट्रीक साहित्याची हानी होऊन जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले. एका गायीचा मृत्यू होऊन जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील शेकडो घरांची अंशत: पडझड झाली. वीज खांब वाकल्याने तब्बल १८ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. उन्हाळी धानपिकांसह भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेत क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामे करून पीडिताना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी लाखांदूर नगर पंचायतचे माजी गटनेता रामचंद्र राऊत यांनी केली आहे.
जीव वाचविण्यासाठी सज्जाचा आधार
लाखांदूर प्लॉट जिरोबा येथील अनिल राखडे यांच्या घराचे छप्पर या वादळात उडाले. उर्वरित छतावरील कवेलु फुटले. दरम्यान, त्याच वेळी जोरदार पाऊस येत होता. वादळ जाेराचे सुरू होते. घाबरलेल्या कुटुंबाने घराच्या सज्जाचा आधार घेतला. तब्बल तासभर ही मंडळी सज्जाखाली होती. अनिलसह पत्नी व दोन मुलांनी जीव मुठीत घेऊन दोन तास काढले.