शहरवासीयांनी अनुभवला थरार
By admin | Published: August 1, 2015 12:10 AM2015-08-01T00:10:46+5:302015-08-01T00:10:46+5:30
भंडारा शहरवासीयांसाठी गुरूवार 'काळा व थरारक' दिवस ठरला. शहरात म्हाडा वसाहतीत घडलेल्या भरदुपारच्या घटनेत एक युवती जखमी...
भंडारा : भंडारा शहरवासीयांसाठी गुरूवार 'काळा व थरारक' दिवस ठरला. शहरात म्हाडा वसाहतीत घडलेल्या भरदुपारच्या घटनेत एक युवती जखमी तर रात्री घडलेल्या घटनेत महिलेला ठार करून तिच्या मुलाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनांचा शहरवासीयांनी थरार अनुभवला. या हल्ल्यामुळे नागरिकांनी येणाऱ्या जाणाऱ्यांवर पाळत ठेवून रात्र जागून काढली.
गुरूवारी मुंबई स्फोटातील याकूब मेमन याला नागपूर येथे फासी देण्यात आली. तर देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळख निर्माण केलेले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दूल कलाम यांच्या निधनाने त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम अशा दोन वेगवेगळ्या घटनेने देश आधीच ठवळून निघाला होता. या दोन्ही घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच भंडारा शहरात दुपारी व रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे अख्ख्या शहराने थरार अनुभवला.
म्हाडा कॉलनीतील शिंदे यांच्या घरी सेल्समनच्या रूपात आलेल्या युवकांनी अश्विनी ही युवती घरात एकटीच असल्याची खातरजमा केल्यावर तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला. या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनास्थळावरील दृश्य बघून प्रत्येकांच्या चेहऱ्यावर भितीचे सावट दिसून येत होते.
दिवस लोटून रात्र होत नाही तोच, पुन्हा शहरातील समृध्दीनगरात दुसरी घटना घडली. हल्लेखोरांनी हृदयाचा थरकाप उडविणारी व क्रूरतेची सिमा ओलांडत महिलेचा निर्दयणे खून केला व तिच्या आठ वर्षिय मुलाला गंभीर जखमी केले. दुपारच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच रात्री घडलेलेल्या या खूनामुळे शहरात नागरिकांची झोप उडाली होती. प्रत्येकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरील दृश्य घटनेची भयान वास्तव करीत होते.
दोन्ही घटनेत रक्ताच्या थारोड्यात जखमी व मृतक पडून असल्याचे दृश्य नागरिकांच्या हृदयाचा थरकाप उडविणारा प्रसंग होता. या दोन्ही घटना शहरात घडल्या आणि त्याही केवळ सात तासाच्या अंतरात. दोन खूनी हल्ल्याच्या घटना घडल्याने शहरातील प्रत्येक नागरिकांचा चेहरा धीरगंभीर व भयभित झाला होता. नागरिकच काय तर आबाल वृध्दही या घटनेने चिंताग्रस्थ दिसत होते. हल्ल्याचे भयान दृश्य बघून अनेकजण अबोल झाले. कित्येकांनी केवळ डोळ्यांच्या इशाऱ्याची भाषा वापरून घटनेच्या तीव्रतेबाबत संताप व्यक्त केला.
ऐव्हाणा, दोन्ही घटनेमुळे शहरवासीयांची झोप पूरती उडाली होती. शहरातील प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात या घटनेची चर्चा व त्याच्या भयानतेमुळे भीतीचे वातावरण सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होते. अनेकांनी तर रात्र जागून काढली. यादरम्यान शहरात अफवांना पेव फुटले होते. कुणी काहिही सांगो, त्यावर विश्वास ठेवून त्याची माहिती जाणून घेण्यासाठी सर्व धडपड करताना दिसत होता. वॉर्डात कोणी अनोळखी इसम दिसला तरी, त्याच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून किंवा कुठे आवाजही झाला तरी नागरिकांचे कान त्याचा मागमूस घेवून भितीतच रात्र जागून काढली. (शहर प्रतिनिधी)
नागरिकांनी सावध राहावे
शहराची लोकसंख्या दिवसागणिक झपट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेकांच्या गरजा वाढत आहेत. नागरिकांच्या गरजा लक्षात घेता, अनेक कंपन्यांनी प्रलोभन देवून घरपोच वस्तू विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. यात अनेक विकृत व्यक्तींनी याचा गैरफायदा घेवून गोरखधंदा सुरू केला आहे. याचा फायदा घेत हे सेल्समॅन घरात शिरतात व असे कृत्य करतात. त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.