शहरातील वाहतुकीचा बट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 09:53 PM2019-05-12T21:53:43+5:302019-05-12T21:54:22+5:30
स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही.
संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही. परिणामी वाहतुकीचा कोंडमारा होत असतून कोणत्या रस्त्याने जावे अशा प्रश्न वाहनधारकांना सारखा सतावत असतो.
शहरातील जिल्हा परिषदचौक ते खात रोड या रस्त्याचे चौपदरीकरण केले जात आहे. सहा महिन्यापुर्वी या कामाला प्रारंभ झाला. सुरुवातीला काही कारणास्तव काम रोखण्यात आले. त्यानंतर कामाने वेग घेतला परंतू महिना संपलातरी काम पूर्णच झाले नाही. या रस्त्यावर शहरातील सर्वाधिक वाहतुक असते. परंतू रस्ता एका बाजूने खोदलेल्या आहे. त्या रस्त्यावरुन चालताना अनेकदा कसरत करावी लागते. मोठे वाहन आले की तासनतास् वाहतूक ठप्प होते. राजीव गांधी चौकात तर वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. कोण कोणत्या बाजूने येईल याचा नेम नाही. चुकीच्या बाजूने वाहन आल्यास वाहतुकीची कोंडी होते. भर उन्हात दुचाकीस्वारांना कोंडीत फसावे लागते. साई मंदिर रोड, शितलामाता चौक येथेही असाच अनुभव येतो.
रस्त्याच्या कामाने वाहतुक कोंढी हा प्रकार समजूनही घेता येईल. मात्र शहरातील इतर भागातही वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. शहरातील गांधी चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी पार्र्किंगची व्यवस्थाच नाही. अनेक व्यावसायीकांची आपली दुकाने रस्त्यावर थाटली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बाजार, बसस्टँड, मुस्लिम लायब्ररी चौकात जाणाºया रस्त्यावर सिग्नल व्यवस्था नाही. रस्त्यावर मनमर्जीने वाहन चालविले जातात. शहरात वाहतुक पोलिसांची नियुक्ती असली तरी तेही हतबल झाल्याचे दिसून येतात. विशेष म्हणजे बसस्थानक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, साई मंदिर या परिसरात शाळा, बँका, हॉस्पीटल अनेक शोरुम आहेत. त्यामुळे वर्दळ असते त्या वर्दळीत अपघात होण्याची कायम भीती असते.
अधिकृत पार्किंग गरजेची
शहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, शितलामाता मंदिर, मेन बाजार परिसरात कुठेही पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. नो पार्किंग असलेल्या ठिकाणी वाहने उभे केली जातात. पोलीसही त्यांच्यावर कारवाई करीत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहने अधिक आहेत. रस्ते गुळगुळीत करताना पार्किंगचीही सुविधा गरजेची झाली आहे.