कुकडे यांची राकाँकडून दावेदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 10:24 PM2018-05-02T22:24:39+5:302018-05-02T22:24:39+5:30
१५ वर्षे भाजपचे आमदार राहिलेले मधुकर कुकडे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्यानंतर आता ते २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून दावेदारी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : १५ वर्षे भाजपचे आमदार राहिलेले मधुकर कुकडे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्यानंतर आता ते २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून दावेदारी केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अद्याप आघाडी झालेली नसली तरी या जागेवर आमचाच हक्क असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. परंतु याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कुठल्याही सूचना कार्यकर्त्यांना आलेल्या नसल्यामुळे संभ्रम कायम आहे.
मधुकर कुकडे हे राष्ट्रवादीचे भंडारा जिल्हाध्यक्ष म्हणून चार वर्षांपासून कार्यरत आहेत. या चार वर्षांत त्यांनी राष्ट्रवादीचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी गावागावात बुथ कमिटी स्थापन करण्यापासून कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचे काम केले. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाविरूध्द आंदोलने, मोर्चे आणि निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांना एकसंघ केले. आजही ते जिल्हा कार्यालयात बैठका घेऊन आणि जिथे गरज आहे तिथे स्वत: जावून जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अग्रेसर राहतात. २०१४ ची निवडणूक राष्ट्रवादीने लढली होती. या निवडणुकीत ही जागा भाजपने जिंकली असली तरी ही पोटनिवडणूक आपणच लढवावी, असा सूर राष्ट्रवादीत आहे. समजा ही पोटनिवडणूक काँग्रेसच्या वाट्याला गेली आणि काँग्रेस निवडून आली तर २०१९ मध्ये दावा सोडणार नाही? असा प्रश्न करून राष्ट्रवादीच ही जागा लढवून जिंकणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांना आहे.
याशिवाय भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांच्यासह गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या नावाचीही राष्ट्रवादीकडून चर्चा सुरू आहे. तरीसुद्धा कोणत्या पक्षाची कुणाला उमेदवारी कुणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पोटनिवडणूक लढण्याची आपली ईच्छा आहे. उमेदवारी मिळाल्यास ही पोटनिवडणूक नक्की लढणार. परंतु उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी खासदार प्रफुल्लभाई पटेल हे जो निर्णय घेतील तो निर्णय माझ्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मान्य राहील.
- मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा.