नागपंचमीतील नारळ फेकण्याच्या स्पर्धेवरून हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 04:52 PM2022-08-04T16:52:35+5:302022-08-04T16:53:39+5:30
गराडाची घटना : एकमेकांना काठीने मारहाण
भंडारा : नागपंचमीच्या सणानिमित्त नारळ फेकण्याच्या स्पर्धेत हरल्यावरून झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी होण्याची घटना भंडारालगतच्या गराडा येथे घडली. याप्रकरणी परस्परविरुद्ध तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बळीराम देवराव खंडाळे (५३) हा नारळ फेकण्याची स्पर्धा हारल्याने आरोपी पंकज आनंदराव मेश्राम (२१) व वैभव विलास चव्हाण (२८) यांनी आम्हाला दारू पाज, असे म्हटले. बळीरामने नकार देताच या दोघांनी त्याची काॅलर पकडून काठीने मारहाण केली. त्याचा मुलगा भूषण खंडाळे व भाऊ शेषराव खंडाळे भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यावरून बळीरामने दिलेल्या तक्रारीवरुन पंकज व वैभव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तर, विलास बापू चव्हाण रा. गराडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नारळ फेकण्याच्या शर्यतीत हारल्यावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. चौकात जाऊन बघितले असता बळीराम खंडाळे हा विलासच्या मुलाला शिवीगाळ करीत होता. याबाबत जाब विचारला असता बळीरामने विलासच्या डोक्यावर व पंकज मेश्राम याच्या खांद्यावर काठीने वार केला. यात ते जखमी झाले. या प्रकरणी कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.