दागिने चमकविण्याच्या नावावर साेन्यावर हात साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 11:41 AM2021-09-26T11:41:02+5:302021-09-26T11:44:29+5:30
भामट्यांनी गॅसवर उकळत्या पाण्यात दागिने साफ करून देताे असे सांगितले. त्यानंतर माेठ्या चलाखीने गॅसवरील भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून या दाेन जावांचे दागिने घेऊन पळ काढला.
भंडारा : दुपारच्या वेळी पुरुष मंडळी घरी नसल्याचे हेरुन दाेन भामट्यांनी दागिने चमकविण्याच्या नावावर महिलांचे साेने घेऊन पळ काढल्याची घटना भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे घडली. २० ते २१ वयाेगटातील या दाेन तरुणांनी १८ हजार रुपयांचे दागिने पळवून नेले. याप्रकरणी कारधा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
सुरभी संदीप गाढवे यांच्या घरी गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दाेन अनाेळखी तरुण आले. सुरुवातीला त्यांनी तांबे, पितळीचे दागिने चमकवून देताे असे सांगितले. बाेलण्यात गुंतवून साेन्याचांदीचे दागिनेही साफ करून देताे असे सांगितले. त्यांच्या बाेलण्यावर विश्वास ठेवत सुरभी यांनी आपली काळ्या मण्याची गळसाेरी, एक डाेरले, चार नग साेन्याचे बारीक मणी त्या भामट्यांच्या हवाली केले. आपल्या जाऊची गरसाेळी व २४ नग साेन्याचे बारीक नगही त्यांना दिले. या भामट्यांनी गॅसवर उकळत्या पाण्यात दागिने साफ करून देताे असे सांगितले. माेठ्या चलाखीने गॅसवरील भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून या दाेन जावांचे दागिने घेऊन पळ काढला. काही वेळात हा प्रकार त्याचा लक्षात आला. याप्रकरणी कारधा पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अशाच प्रकारचा एक गुन्हा गोंदिया येथे घडला असून त्याचे सीसीटीवी फुटेज हाती लागले आहे. ज्याचा आधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.