बाहेरचं स्वच्छ अन् घरचं खरखटं ठेवायचं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:48 PM2018-04-22T21:48:33+5:302018-04-22T21:48:33+5:30
गावात रेती मातीने नाल्या बुजल्या आहेत. नालीत पाणी अडून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे आजार बळावत आहेत. तथापि बाहेरच्या नगरातील नाल्या साफ करून प्रसिद्धी मिळविली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : गावात रेती मातीने नाल्या बुजल्या आहेत. नालीत पाणी अडून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे आजार बळावत आहेत. तथापि बाहेरच्या नगरातील नाल्या साफ करून प्रसिद्धी मिळविली जाते. घरचे खरखटं ठेवायचे अन् बाहेरचे स्वच्छ करायचे असंच चित्र सध्या कान्हळगाव / सिरसोली येथील गावात होत आहे.
कान्हळगाव (सिरसोली) येथील सरपंच गावी राहत नाही. मोहाडी येथे राहून गावाचा कारभार चालवित आहेत. गावातील एकही नाल्या स्वच्छ केलेल्या नाहीत. कोणत्याही वॉर्डात जा, कुठे नाल्या रेती मातीने बुजलेल्या तर कुठे पाण्याने साचलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी नाल्या आहेत काय याचा शोध घेण्यास उशिर लागतो. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी नाल्यावरच अतिक्रमण केले आहे.
नालींमध्ये पाणी साठवण होत आहे. त्यामुळे नालींमधील पाण्याचा निचरा होत नाही. त्या कारणाने मोठ्या प्रमाणात नाल्या डासांची निर्मिती केंद्र बनली आहेत. स्वाभाविकच गावातील जनतेला रोगराईचा सामना करावा लागत आहे. गावातील कचरा कधीच साफ केला जात नाही. त्यामुळे चौकात व वाटेने कचरा पडलेला दिसतो.
आठवडी बाजारातील कचरा कधीच साफ केला जात नाही. नवीन नालीचे बांधकाम केले जाते. मात्र ज्या नाल्या तयार झाल्या आहेत त्यातील पाणी प्रवाहित होतो काय? कुठे नाल्या बुजल्या आहेत याची साधी पाहणीही गावातील सरपंच करीत नाही. सरपंच मोहाडी येथे राहत असल्याने गावाचा कारभार असाच सुरु आहे. गावातील समस्या, जनतेच्या समस्या जाणून घेण्याची वेळ कधीच सरपंच यांना मिळत नाही.
सिरसोली / डोंगरला या टी पॉइंटवर अकरा वर्षापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. त्यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले यांनी भूमिपूजन केले होते. पण त्यानंतर गावाच्या सत्तेत आलेल्या सरपंचांनी कवडीचाही लक्ष दिला नाही. आधी पती व आता पत्नीच्या हाती गावचा कारभाराची सूत्रे हे गावकऱ्यांनी सोपविली. पण मोहाडी येथे राहून सरपंच गावाचा विकास साधत नसल्याचे गावकऱ्यांना दिसू लागले आहे. त्या गुरुदेव चौकात काही लोकांनी जनावरे बांधण्याचा काम चालविला आहे. गुरुदेव चौक नामकरण झालेल्या जागेत जनावरांचे शेण, मुत्र त्या भूमिपूजनाच्या दगडावर जात आहे. अशावेळी तरी सरपंचांनी लक्ष देणे आवश्यक होते. पण केवळ सत्ता गाजवायचे, गावाच्या अस्वच्छतेकडे लक्ष द्यायचे नाही असाच विचार सरपंच करीत आहेत. मात्र घरच्या शेजारील नाली साफ करून फोटो काढायची व स्वच्छता करीत असल्याचे भासवून फुकटची प्रसिद्धी मिळवून स्वत:च्या पाठीवर शाबासकीची थाप स्वत:च द्यायचा प्रकार दिसून आला आहे. गावातील सर्व नाल्या मोकळ्या करण्यात याव्या व गाव स्वच्छता मोहीम हाती घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.