सामान्य रूग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा
By admin | Published: March 31, 2017 12:32 AM2017-03-31T00:32:30+5:302017-03-31T00:32:30+5:30
गरिबांसह सर्वसामान्यांचा दवाखाना म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा वाजला आहे.
घाणीच्या विळख्यात नळ : जागोजागी अस्वच्छता, पाण्याची समस्या बिकट, रूग्णालयाला राज्यस्तरावरील पारितोषिक
भंडारा : गरिबांसह सर्वसामान्यांचा दवाखाना म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा वाजला आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेल्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता व घाण पसरलेली आहे. त्याच ठिकाणातून रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याचे पाणी प्यावे लागत असल्याचे चित्र दिसून आले.
भटके विमुक्त विकास परिषदेच्या पदाधिकारी एका रूग्णाला पाहण्यासाठी बुधवारला रात्री जिल्हा सामान्य रूग्णालयात गेले असता त्यांना रूग्णाच्या नातेवाईकाला पिण्याचे पाण्यासाठी रूग्णालय परिसरात फिरावे लागले. त्यानंतर गुरूवारला सकाळी पुन्हा भेट दिली असता या रूग्णालय परिसरात केवळ एक नळ आहे. तिथेच रूग्ण व त्यांचे नातेवाईक पिण्याचे पाणी घेत असल्याचे दिसून आले. रूग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी ज्याठिकाणी हे नळ आहे, त्या परिसरातील पाणी प्यावे तरी कसे? असा प्रश्न येतो. अस्वच्छतेमुळे आरोग्य सुधारण्याऐवजी आणखी बिघडण्याची भीती आहे. याच परिसरात जेवनानंतर उरलेले अन्न जमा करण्यासाठी असलेल्या पात्राची स्वचछता होत नसल्यामुळे तिथून दुर्गंधी सुटलेली आहे. शासन सामान्य रूग्णालयात रूग्णांसाठी विविध योजना राबविते. त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी येतो. परंतु स्वच्छता व पिण्याच्या पाण्यासाठी किती कोटींचा निधी खर्च करण्यात आला, निधी खर्च झाला असेल तर रूग्णांना सुविधा मिळाल्या का? असा प्रश्न करून सामान्य जनतेने नालीवरच्या पाण्यावर तहान भागवायची का? असा प्रश्नही अखिल भारतीय भटके विमुक्त विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष उकंडा वडस्कर, कोषाधाक्ष साजन वाघमारे यांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)