गावाची स्वच्छता ग्रामस्थांच्या हातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:25 PM2018-02-09T22:25:59+5:302018-02-09T22:26:47+5:30
गावाचा विकास, शिक्षण, स्वच्छता असो वा आरोग्य हे सर्व काही ग्रामस्थांच्याच हातात आहे. स्वत:च्या मुलांच्या शैक्षणिक कामाची माहिती, मुलांशी मैत्री, राग आलाही असेल थोडावेळ शांत बसा यामुळे तंटा भांडण होणार नाही.
आॅनलाईन लोकमत
अड्याळ : गावाचा विकास, शिक्षण, स्वच्छता असो वा आरोग्य हे सर्व काही ग्रामस्थांच्याच हातात आहे. स्वत:च्या मुलांच्या शैक्षणिक कामाची माहिती, मुलांशी मैत्री, राग आलाही असेल थोडावेळ शांत बसा यामुळे तंटा भांडण होणार नाही. दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वत:चे दोष दूर करणे आवश्यक असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी अनिता तेलंग यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत अड्याळ कार्यालयातर्फे एकदिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी तेलंग बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अड्याळ येथील सरपंच जयश्री कुंभलकर तर अतिथी म्हणून चकारा येथील सरपंच हेमलता ढवळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, तारा कुंभलकर, मुख्याध्यापिका मंगला आदे , जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील समुपदेशक प्राजक्ता पेठे, शुभांगी पवार, सुमन मुनिश्वर, विस्तार अधिकारी आर.एच. पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रभाकर लेपसे ग्रामपंचायतील महिला सदस्यगण मंचकावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिलांना व ग्रामस्थांना आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. दरवर्षी होणाºया महिला मेळाव्यापेक्षा यावर्षी मात्र या कार्यक्रमासाठी वेगळीच कल्पना समोर आली ती म्हणजे या मेळाव्यात आलेल्या महिलांची नावे वॉर्ड नंबर निहाय नोंदणीकृत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला ग्रामस्थांना भेटवस्तू दरवर्षी देण्यात येते.
यावेळी मात्र हजारोच्या संख्येने उपस्थिती असल्याने कार्यक्रम शांततेत पार पडावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित नाव नोंदणी केल्या असलेल्या महिला ग्रामस्थांच्या घरोघरी ही भेटवस्तू पाठवणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते.
यामुळे या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर काही नाराजही झाले. परंतु एवढ्या मोठ्या गर्दीत एकही गालबोट तथा कार्यक्रमाची शांतता भंग झाली नसल्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे यांनी केले. अड्याळ व परिसरातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांचा या मेळाव्यात सहभाग होता.
ग्रामपंचायत कार्यालय अड्याळतर्फे आयोजित महिला मेळाव्यात उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे व महिला ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी अड्याळ व परिसरातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी नाटक, नृत्य, स्वच्छता अभियान पर नाट्य कला सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. यात जिल्हा परिषद शाळा ते विद्यालयातील लहान मोठ्या विद्यार्थीनींनी कला सादर करून सर्वांची मने जिंकली.
लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केला गेला असल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथील सरपंच जयश्री कुंभलकर यांनी सांगितले. या सांस्कृतीक कार्यक्रमामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले. या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी यांनी सहकार्य केले.