लिपीकाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:27 PM2018-03-06T23:27:44+5:302018-03-06T23:27:44+5:30
सामान्य खातेदारांना मनमानी कारभाराने त्रस्त करणाऱ्या सिहोरा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत कार्यरत कनिष्ठ लिपीक गणेश ठोके यांना चांगलेच धारेवर घेतले आहे.
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : सामान्य खातेदारांना मनमानी कारभाराने त्रस्त करणाऱ्या सिहोरा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत कार्यरत कनिष्ठ लिपीक गणेश ठोके यांना चांगलेच धारेवर घेतले आहे. श्रीमंत खातेदारांची जलद गतीने कामे करुन सामान्य खातेदारांना तात्कळत ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे कनिष्ठ लिपीकाला सोमवारी समज देण्यात आली.
सिहोरा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत खातेदारांसोबत कनिष्ठ लिपीक श्रीमंत आणि सामान्य खातेदारामध्ये कामे करतांना भेदभाव करीत आहे. दुपारच्या सु्टीत नियम धाब्यावर बसवित श्रीमंत खातेदारांना खुर्ची देवून सन्मानाची वागणुक देण्यात येत आहे. दुसरीकडे सामान्य खातेदारांना बँकेत बसून राहण्याचे बजावित आहे. सामान्य खातेदारांनी बँकेत असणारे आर्थिक व्यवहार बंद केले आहे. या गावात राष्टÑीयकृत एकच बँक असल्याने कार्यरत कर्मचारी मनमर्जीने कामे करीत आहेत. समस्याचे निराकरण करण्यासाठी कनिष्ठ लिपीक यांचेकडे जाणारे सामान्य खातेदार माघारी परततात. या शाखेत कर्मचारी आरोचे पाणी पितात, तर लिपीक खातेदारांना घरुन पाणी आणण्याचे सांगत आहे. यामुळे खातेदारांत असंतोष निर्माण झाला आहे. बँकेत असणारे बहुतांश आर्थिक व्यवहार गोपनिय असतात. अनेक व्यवहारांना माहिती अधिकार कायद्यापासून दुर ठेवण्यात आले आहे. पंरतु हे व्यवहार तपासण्याचे अधिकार रोजंदारी कामगारांना कनिष्ठ लिपीकांनी दिले आहेत. सामान्य खातेदार यांनी बचत खाते पुस्तिका आर्थिक व्यवहार नोंद करण्यासाठी लिपीकाला दिले असता अन्य दिवशी व नंतर येण्याचे सांगण्यात येते.सोमवारी सामान्य खातेदारांना तासभर उभे ठेवल्याने लिपीका विरोधात गोंधळ घातल्यानंतर ही बाब अन्य कर्मचाºयांचे निदर्शनास आली. लिपीकाला हटविण्याची मागणी आहे.
बँकेत खातेदारासोबत भेदभाव करता येत नाही. मधल्या सुटीत कामे करता येत नाही. नियम सर्वांसाठी सारखे आहे. श्रीमंत खातेदारांची कामे लिपीकांनी केली असल्याचे गैर आहे.
- एस. आर. मांडवे
प्रबंधक, बीओआय शाखा, सिहोरा
बँकेत मर्जीनुसार कामे करणार आहे. आधी श्रीमंत खातेदारांची कामे महत्वाची आहेत. सामान्य खातेदारांना जे करायचे ते करु शकतात.
- गणेश ढोके,
कनिष्ठ लिपीक बीओआय शाखा, सिहोरा
सदर लिपीका विरोधात अनेक तोंडी तक्रारी आहेत. सामान्य खातेदार त्रस्त झाल्याने ठिय्या आंदोलन करू.
- मोतीलाल ठवकर,
शेतकरी नेते सिंदपुरी