चांदोरी-शिंगोरी रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:36 PM2019-08-04T22:36:54+5:302019-08-04T22:37:28+5:30
तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गत पाच दिवसांपासून भंडारा तालुक्यात संततधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे शिंगोरी-चांदोरी दरम्यान असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या मार्गावरुन दवडीपार, पचखेडी, चांदोरी, शिंगोरी येथील नागरिकांना आवागमन करण्यास अडचणीचे ठरत आहे. चांदोरी येथील नागरिकांना भंडारा येथे जाण्यासाठी एकमेव मार्ग चांदोरी-शिंगोरी मार्ग आहे. भंडारा, लाखनी, दवडीपार, तिरोडा असे मार्ग येथून जात असून गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यासंबंधी चांदोरी-शिंगोरी रस्त्यावरील नाल्यावर पुल बांधकामाची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांनी केली होती. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. दरवर्षी या पुलावर अनेक जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरही या मार्गावर पुल बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत तर नाही ना, असा सवाल चांदोरी परिसरातील नागरिकांनी केला आहे.
या मार्गावरून अनेक लोकप्रतिनिधी ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते प्रशासन व लोकप्रतिनिधींशी नेहमीच नाल्यावर पुल बांधकामाची मागणी करीत असतात. मात्र त्यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. चांदोरी, पचखेडी, दवडीपार येथील बहुतांश विद्यार्थी भंडारा, लाखनी येथे शिक्षणासाठी जात असतात. नाल्यावर पाणी वाहत असल्याने त्यांना शाळेत जाता येत नाही. पुलावर पाणी असल्याने तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना पोहचता येत नाही. परिणामी आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकार व राज्य शासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगत असले तरी याला चांदोरी नजीकचा नाला अपवाद ठरत आहे.
अनेक वर्षांपासून पुलाची मागणी धूळखात
लाखनी, भंडारा मार्गावर असलेल्या शिंगोरी फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या चांदोरी गावानजीक एक मोठा नाला आहे. दरवर्षी या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. दमदार पावसाची हजेरी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी नाल्याद्वारे वैनगंगा नदीला पोहचते. या नाल्यावर दरवर्षी बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. जीवीतहानीसह प्राणहानी होत असली तरी पुल बांधकामासाठी कुणीच पुढाकार घेत नसल्याने पुल बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे. भंडारा तालुका काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी उन्हाळ्यात पुल बांधकामाची मागणी प्रशासनाकडे केली होती. असे असतानाही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनावरचा विश्वास उडाल्याचा संताप परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन आता तरी पुल बांधकामासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.