शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:21 PM2018-09-11T22:21:09+5:302018-09-11T22:21:40+5:30
वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी शहरातील विविध चौकात तीन वर्षांपुर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेची वस्तु झाले आहे. शहरातील ६५ महत्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी केवळ तीनच कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती आहे. नगर परिषदेने नाविण्यपूर्ण योजनेतून तब्बल ६८ लाख ७७ हजार रुपयांचा खर्च केला. पंरतु याचा उपयोग कुणालाही झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी शहरातील विविध चौकात तीन वर्षांपुर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेची वस्तु झाले आहे. शहरातील ६५ महत्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी केवळ तीनच कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती आहे. नगर परिषदेने नाविण्यपूर्ण योजनेतून तब्बल ६८ लाख ७७ हजार रुपयांचा खर्च केला. पंरतु याचा उपयोग कुणालाही झाला नाही.
नगर परिषदेच्या वतीने नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत २०१४-१५ मध्ये चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित करण्यात आले. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने ७२ लाख १९ हजार रुपयांचा खर्चाला मंजूरी प्रदान केली. त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळवून एका कंत्राटदाराला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे कंत्राट देण्यात आले. शहरातील १७ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. देखभाल दुरुस्तीची व्यवस्थाही करण्यात आली. या कॅमेरांचा नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला. यातून संपूर्ण शहरावर तिसºया डोळ्यातून लक्ष ठेवणे सुरु झाले. पोलीस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्यास मोलाची मदत होवू लागली. परंतु देखभाल दुरुस्ती अभावी हे कॅमेरे चालेनासे झाले. आता नादुरुस्ती झालेल्या कॅमेराकडे कुणी लक्षही देत नाही. शहरातील ६८ पैकी केवळ तीन कॅमेरे सुरु आहेत. नगर परिषदेने नामवंत कंपनीचे कॅमेरे खरेदी केले असतांना काही महिन्यातच कॅमेरे नादुरुस्त झाले. त्यामुळे कॅमरेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
येथे लागले होते सीसीटीव्ही कॅमेरे
खांबतलाव चौक, छोटा बाजार चौक, एमआयडीसी वसाहत, हत्तीखाना चौका, सामान्य रुग्णालय चौक, नागपूर नाका चौक, पोस्ट आॅफीस चौक, मिस्कीन टँक चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, बसस्थानक चौक, मोठा बाजार चौक, गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, शितलामाता चौक, त्रिमुर्ती चौक, शास्त्री चौक या ठिकाणी कॅमेरा लावण्याचे निश्चीत झाले. बहुतांश ठिकाणी कॅमेरे लावण्यातही आले.
हल्लेखोरांना पकडण्यात आले होते यश
भंडारा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर गुन्हेगारांना वटणीवर आणण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश आले होते. शहरात घडलेल्या प्रिती पटेल व शिंदे कुटूंबावरील हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनेच गाठले होते. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यावेळी कुणीही गुन्हा करतांना दहावेळा विचार करीत होता. पंरतु आता कॅमेरेच बंद झाल्याने गुन्हेगारांना मोकळे रान झाले आहे.