डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद; अडीच हजार ज्येष्ठांसमोर अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:43+5:302021-05-13T04:35:43+5:30
भंडारा : कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. मात्र, नियमित तपासणी सुरू आहे. आधीच कोविड संसर्गामुळे ...
भंडारा : कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. मात्र, नियमित तपासणी सुरू आहे. आधीच कोविड संसर्गामुळे रुग्णांमध्ये भीती व्याप्त आहे. नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी ज्यांचा मोतीबिंदू पिकला आहे, तेही कोरोनाच्या धास्तीमुळे शस्त्रक्रिया करायला पुढे येत नाहीत किंवा कुणी शस्त्रक्रिया करायला आले तरी त्यांची शस्त्रक्रिया सध्याच्या परिस्थितीमुळे करता येत नाही.
भंडारा जिल्ह्यातील अडीच हजारांवर ज्येष्ठ नागरिकांच्या शस्त्रक्रिया न झाल्यामुळे त्यांच्यापुढे अंधार आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतात. कोरोना सुरू होण्यापूर्वी वर्षाकाठी तीन हजारांवर नेत्र शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. परंतु, कोरोनामुळे आधी सहा महिने व त्यानंतर आता गत दोन महिन्यांपासून नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नेत्र शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना ठेवण्यात येणारे वॉर्ड कोविड रुग्णांसाठी दिल्याने या नेत्र शस्त्रक्रिया सद्य:स्थितीत तरी बंद आहेत. या विभागासमोरच कोविड ब्लाॅक आहे. गत वर्षी एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात ५४५ नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णांसाठी नेत्र वॉर्ड देण्यात आल्यामुळे गोरगरीब रुग्णांसमोर आता अंधार पसरला आहे.
कोरोनामुळे नेत्र चिकित्सा विभाग बंद होते. मागील आर्थिक वर्षापर्यंत नेत्र शस्त्रक्रिया ५४५ झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तसेच नेत्र विभागात कोविड रुग्ण असल्याने शस्त्रक्रिया करणे बंद आहे. सद्य:स्थितीत नेत्र तपासणी सरू आहे. आगामी काळात स्थितीचे अवलोकन करून नेंत्र शस्त्रक्रिया सुरू करण्यात येतील.
-डॉ. निखिल डोकरीमारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.
कोरोना संसर्गामुळे नेत्र शस्त्रक्रिया बंद आहे, याची माहिती नव्हती. तपासणी झाली, पण शस्त्रक्रिया होणार नाही, हे वेळेवर कळले. आता गत दोन महिन्यांपासून नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. आता खासगीत जाऊन शस्त्रक्रिया करावी लागणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे. औषध मिळाले आहे.
-कल्पना पुसाम, तुमसर
कोरोनामुळे नेत्र शस्त्रक्रियेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. डोळ्यांतील मोतीबिंदू पिकले आहे. सध्या शस्त्रक्रिया करणे बंद आहे. डिसेंबरपासून शस्त्रक्रिया सुरू झाल्याची माहिती होती. त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो होतो; पण आता ऑपरेशन होणार नसल्याने फक्त ड्राॅप आणि औषध देऊन घरी पाठविण्यात आले.
- कोठीराम चोपकर, भंडारा
कोरोनामुळे अन्य आजारांकडे दुर्लक्ष करण्यात आले काय असे वाटत आहे. डोळ्यांच्या समस्या वाढल्याने तपासणीसाठी यावे लागले. परंतु कोरोनाच्या धास्तीमुळे नेत्र शस्त्रक्रिया कुणी करायलाच तयार नाही. रुग्णालयात केव्हा शस्त्रक्रिया सुरू होणार याची नेमकी माहिती नाही.
- लता किरणापुरे, लाखनी