मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस
By admin | Published: May 9, 2016 12:24 AM2016-05-09T00:24:56+5:302016-05-09T00:24:56+5:30
मागील तीन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज रविवारला सकाळपासून निरभ्र वातावरण होते.
जनजीवन विस्कळीत : शेतातील कापणी झालेल्या पिकांचे नुकसान, विजेचा लपंडाव
भंडारा : मागील तीन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज रविवारला सकाळपासून निरभ्र वातावरण होते. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल होवून जिल्ह्यात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह रिमझीम तर भंडारा शहरात मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा रबी पिकांना जबर फटका बसला असून शेतक-यांची धावाधाव झाली. भंडारा शहरात ३.२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कारधा पर्जन्यमान खात्याने केली.
‘मे हिट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच नागरिक उष्णतेच्या काहिलीने त्रस्त झाले होते. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाची प्रखरता जाणवत असल्याने नागरिकांनी घराबोहर पडने बंद केले होते. अशा स्थितीत मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वीजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
भंडारा शहरात रविवारला सकाळपासून निरभ्र वातावरण होते. मात्र दुपारी साडेतीन वाजतापासून वातावरणात बदल घडला. ढग दाटून आल्यानंतर वादळी वारा सुरु झाला. दुपारी ४ वाजेपासून अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्यांना काही प्रमाणात का होईना तो उकाड्यापासून दिलासा देणारा ठरला आहे. दरम्यान वीज पुरवठा खंडीत झाला होता.
साकोलीत सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. आज आठवडी बाजार असल्याने बाजारात खरेदी-विक्रीसाठी आलेल्यांची चांगलीच धावपड झाली. वादळी पावसाने छोट्या व्यावसायिकांची दुकानांमध्ये नागरिकांनी आश्रय घेतल्याने सर्वांची तारांबळ उडाल्याचे एकच चित्र दिसून येत होते. भारतीय हवामान विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार दि. ९ मे पर्यंत विदर्भात गारपीटसह पाऊस पडणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
नागरिकांची त्रेधातिरपीट
भंडारा शहराचा रविवारी आठवडी बाजार असल्याने व उद्या सोमवारला अक्षय्य तृतीय सणाची खरेदी करण्याकरिता अनेक कुटुंब दुपारीच बाजारपेठेत गेले होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे खरेदी करताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी मिळेल तिथे त्यांनी आश्रय घेऊन स्वत:चा पावसापासून बचाव केला. अवकाळी पावसामुळे अक्षय्य तृतीयेच्या खरेदीवर परिणाम पडला.
शेतातील पिकांचे नुकसान
रबी हंगामातील चणा, धान, ज्वारी, जवस आदी पिकांना या पावसाचा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी रबी पिकाची कापणी करुन शेतात साठा केला होता. मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची यावेळी तारांबळ उडाली. यासोबतच विटाभट्टी व्यवसायीकांना याचा भटका बसला असून वीटभट्टी मालकांचे हजारोंचे नुकसान झाले आहे.
तुमसरात पाऊस, पालांदूरात वादळ
भंडारा शहरासह तुमसर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बळीराजासाठी तो नुकसानीचा ठरला आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे वादळाने हजेरी लावली. यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये छप्परे उडण्याची भीती निर्माण झाली होती. वादळानंतर रिमझीम पावसाने हजेरी लावली.