भंडारात ‘सीएम चषक’ स्पर्धा शुक्रवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:51 PM2019-01-02T21:51:08+5:302019-01-02T21:51:38+5:30
‘सीएम चषक’ स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन भंडारा येथे ४ ते ५ जानेवारी दरम्यान खात रोडवरील माधवनगरातील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे ११०० खेळाडू सहभागी होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘सीएम चषक’ स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन भंडारा येथे ४ ते ५ जानेवारी दरम्यान खात रोडवरील माधवनगरातील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे ११०० खेळाडू सहभागी होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी दिली.
भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने आयोजित या क्रीडा व कला महोत्सवाचा प्रारंभ ४ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, म्हाडाचे अध्यक्ष मो. तारीक कुरैशी, आमदार अनिल चोले, आमदार डॉ. गिरीश व्यास, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार उपस्थित राहतील. शुक्रवारी सकाळी १० वाजता गांधी विद्यालयापासून क्रीडाज्योत आणली जाईल. त्यानंतर स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेअंतर्गत क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, कुस्ती, कॅरम, कबड्डी आदी स्पर्धा आयोजित आहे. तर दररोज सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित आहे. या स्पर्धेचे मुख्य संरक्षक आमदार डॉ. परिणय फुके असून अभियान संरक्षक नगराध्यक्ष सुनील मेंढे आणि संयोजक म्हणून निशिकांत इलमे काम पाहत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना देण्यासाठी राज्यभर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच परिसरात बचतगटामार्फत स्टॉल आणि कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात विशेष प्राविण्य प्राप्त व पुरस्कारप्राप्त खेळाडू, माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला म्हाडाचे अध्यक्ष मो. तारीक कुरेशी, नगर परिषद उपाध्यक्ष आशु गोडाणे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे, चैतन्य उमाळकर उपस्थित होते.
पुणे येथे होणार राज्यस्तरीय स्पर्धा
सीएम चषक स्पर्धेअंतर्गत विधानसभानिहाय विजेते संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होत आहे. जिल्हास्तरावर विजेते झालेले संघ राज्यस्तरीय सीएम चषक स्पर्धेत सहभागी होतील. ही स्पर्धा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. तर राज्यस्तरीय स्पर्धेतून विजेते संघ खेलो इंडियाअंतर्गत सहभागी होणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.