मुख्यमंत्री शिंदे १२ नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर; २०० कोटींच्या कामाचे भूमिपूजन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 02:53 PM2022-11-10T14:53:58+5:302022-11-10T14:54:40+5:30
भंडारा जिल्ह्याच्या विकासाकरिता मुख्यमंत्री कटिबद्ध - आमदार नरेंद्र भोंडेकर
भंडारा : मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमत: १२ नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यात २०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बुधवारी दिली. विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
आ. भोंडेकर म्हणाले, १२ नोव्हेंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आगमन भंडारा येथे होत आहे. भंडारा जिल्ह्याच्या विकासाकरिता मुख्यमंत्री कटिबद्ध आहेत. विधानसभा क्षेत्रातील बुद्ध विहारात अधात्म्य सोबत शिक्षणाची साथ मिळावी याकरिता अत्याधुनिक ईलायब्ररी व शाळांचे आधुनिकीकरण सोबतच क्षेत्रातील रुग्णालयांना सुविधा देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या हस्ते भंडारा शहरातील नाशिक नगरातील बुद्ध विहारातील ई. लायब्ररीचे उद्घाटन, शास्त्री चौक येथील हुतात्मा स्मारक, खांब तलाव सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन करण्यात येईल.
त्यानंतर खात रोड स्थित रेल्वे मैदानात सभेचे आयोजन केले असून, याअगोदर भूमिगत गटारी योजनेचे भूमिपूजन केले जाईल. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले आहे. या वेळी शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल गायधने आणि शहर अध्यक्ष मनोज साकुरे उपस्थित होते.