मुख्यमंत्र्यांनी साधला पालकमंत्र्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:56+5:30
साथरोगाला प्रतिबंध, नागरिकांची सुरक्षितता व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यादृष्टीने जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्याकडून चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या अनुषंगाने निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा दिली. जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी आरोग्य, महसूल व विविध यंत्रणा सुसज्ज आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील कार्यवाहीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.
साथरोगाला प्रतिबंध, नागरिकांची सुरक्षितता व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यादृष्टीने जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्याकडून चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या अनुषंगाने निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा दिली. जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी आरोग्य, महसूल व विविध यंत्रणा सुसज्ज आहेत. परदेशातील तसेच मुंबई-पुण्याहून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना होम क्वारंटाइनबाबत निर्देश देण्यात आले आहेत. वैद्यकीय पथकांमार्फत त्यांच्याशी नियमित संपर्क होत आहे. आवश्यक वाटल्यास नागरिकांचे थ्रोट स्वॅब घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह व्यक्ती नाही. आवश्यकता भासल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसर येथे क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. संचारबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यातील उत्पादक, विक्रेते, वितरक यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पालकमंत्र्यांनी त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या व त्यांना सहकार्य करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्याकडून पालकमंत्र्यांकडून विविध बाबींची माहिती वेळोवेळी घेतली जात आहे. नागरिकांच्या शंका-समाधानासाठी व त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत:च्या निवासस्थानाचा लँडलाइन फोनही हेल्पलाइन नंबर म्हणून उपलब्ध करून दिला आहे. तीन जणांचे पथकही त्यासाठी नियुक्त केले आहे. याबाबत माहिती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान दिली.