मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते लॉकडाऊनमुळे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:38 AM2021-04-28T04:38:02+5:302021-04-28T04:38:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड ( सिहोरा ) : सिहोरा परिसरातील गावांना थेट तुमसर बपेरा राज्य मार्गाला जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड ( सिहोरा ) : सिहोरा परिसरातील गावांना थेट तुमसर बपेरा राज्य मार्गाला जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंजुरी देण्यात आली असली तरी लॉकडाऊनमुळे रस्त्याचे बांधकाम प्रभावित झाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गच्या भीतीमुळे कंत्राटदारासह मजूर, कामगारांनी पोबारा केला आहे. परिणामतः पुलाच्या बांधकामाला पाणीच मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. यामुळे गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिहोरा परिसरातील गावांना थेट तुमसर बपेरा राज्य मार्गाला जोडण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांनी नियोजन केले होते. निवडणुकी पूर्वी या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाचा झंझावात निर्माण केला होता. निवडणुकीनंतर प्रत्यक्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांना सुरुवात झाली होती. रास्ता डांबरीकरण व खडीकरणच्या कामातील गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. अनेक रस्ते महिनाभरात उखडल्याने आरोप प्रत्यारोप झाले. परंतु कामे थांबले नाहीत. या कालावधीत निधीचे अडचणी वाढल्या होत्या. नंतर कोरोना विषाणू संसर्गच्या प्रादुर्भावाने डोके वर काढल्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कामे प्रभावित झाले आहेत.
या योजने अंतर्गत रस्त्याचे खडीकरनाचे कामे सुरू करण्यात आले. पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहेत. परंतु लॉकडाऊन घोषित होताच कामे बंद करण्यात आली आहेत. भर उन्हाळ्यात पुलाचे बांधकामाला मजबुतीकरणासाठी पाण्याची गरज असताना ते मिळणे बंद झाले आहे. कोरोना विषाणू संसर्गच्या वाढत्या प्रभावाने कंत्राटदारासह मजूर, कामगारांनी पोबारा केला आहे. त्यांचे फिरकणे बंद झाले असल्याने विकास कामे प्रभावित झाले आहेत. निधी अभावी रस्त्याचे बांधकाम अडले असल्याचे लक्षात येताच आमदार राजू कारेमोरे यांनी निधी खेचून आणण्याचे प्रयत्न केले आहेत. बिनाखी ते गोंडीटोला मार्गाचे नवीन कामासाठी त्यांनी निधी खेचून आणला आहे. दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे कालावधी नियोजन आहे. या कालावधीत कामे पूर्ण होणार नाहीत. अशी शक्यता आहे. यामुळे गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम लांबणीवर जाणार आहेत. गावांना जोडणारे रस्त्याचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले असल्याने गावकरी मात्र त्रस्त झाले आहेत. ब्राह्मणटोला, बिनाखी ते गोंडीटोला, सुकली नकुल तथा महालगाव फाटा ते गोंडीटोला रस्त्याचे डांबरीकरण अडले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने गावकरी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याची ओरड करीत आहेत.
बॉक्स
रस्त्याची नियोजित जागा शेतात
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर ई निविदा अंतर्गत कामे कंत्राटदारांना उपलब्ध झाले आहेत. रस्त्याची नियोजित जागा मोजमाप करण्यात आली आहे. जागा शेतात असल्याने अतिक्रमणात गेली असल्याने कंत्राटदार हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांनी जागा हडपल्यानंतर थेट धुऱ्याचे बांधकाम रस्त्यावर आणले आहेत. यामुळे रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विकास कामात शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. मुख्य रस्ते अतिक्रमणात गेल्यानंतर पाणंद रस्त्याची कल्पनाच करता येत नाही.