सहकारातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही!
By admin | Published: January 3, 2017 12:27 AM2017-01-03T00:27:46+5:302017-01-03T00:27:46+5:30
सहकार क्षेत्र हा ग्रामीण जिवनाचा कणा आहे. सहकार तथा बाजार समित्यांचा थेट संबंध शेतकऱ्यांशी येतो.
चरण वाघमारे : तुमसर बाजार समितीत शेतकरी मेळावा
तुमसर : सहकार क्षेत्र हा ग्रामीण जिवनाचा कणा आहे. सहकार तथा बाजार समित्यांचा थेट संबंध शेतकऱ्यांशी येतो. या दोन्ही क्षेत्रात कामे करण्याची गरज आहे. सहकारातील भ्रष्टाचार कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार चरण वाघमारे यांनी दिला आहे.
तुमसर -मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित शेतकरी प्रतिनिधी मेळावा, चर्चासत्र व शेतकऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.
मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, मोहाडीचे सभापती हरिचंद्र बंधाटे, उपसभापती विलास गोबाडे, आशिष पात्रे, मयुरध्वज गौतम, कलाम शेख, बाबुराव ठवकर, पल्लवी कटरे, उषा बोंदरे उपस्थित होते.
यावेळी आ. चरण वाघमारे म्हणाले, भंडारा जिल्ह्यात धान घोटाळा उघडकीस आला असून तपासात ४० कोटी रूपयांचा घोटाळा झाला असून हा घोटाळा एकून १०० कोटींचा असल्याचे अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी दिसत आहे. या घोटाळ्याची रक्कम विकासात्मक कामांना द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, सहकारात राजकारण आणता कामा नये, दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत.
भंडारा व गोंदिया या दोन्ही बँकेचा आढावा घेतला असता, गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या एका शाखेतून १० कोटी गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बँकेचा एनपीए गोंदिया जिल्ह्यात ४० टक्के गेला आहे. २२८ कर्मचारी भंडारा जिल्ह्यात कार्यरत आहेत. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शेतकरी हाच केंद्रबिंदू असावा हा आपला उद्देश आहे.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, तारिक कुरैशी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समितीचे प्रभारी सचिव अनिल भोयर यांनी तर संचालन डॉ. हरेंद्र राहांगडाले यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)