दुचाकीस्वारांना वाचविताना कोळशाचा ट्रक उलटला, चालक-वाहक थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 06:10 PM2021-12-29T18:10:21+5:302021-12-29T18:15:38+5:30
तिरोडा येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना वाचविताना अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी सर्व्हिस रस्त्यावरून खाली उतरला. पावसामुळे सर्व्हिस रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे ट्रक रस्त्याशेजारी उलटला.
भंडारा : दोन दुचाकीस्वारांना वाचविताना तिरोडा येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन एमआयडीसीच्या संरक्षण भिंतीजवळ उलटला. त्यामुळे संरक्षण भिंत तुटली. अपघातात चालक व वाहक सुदैवाने बचावले. सर्व्हिस रस्ता बांधकाम न केल्यामुळे ट्रक चिखलमय रस्त्यामुळे उलटला. हा अपघात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास देव्हाडी शिवारात घडला.
तिरोडा येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रक एमआयडीसीजवळील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी सर्व्हिस रस्त्यावरून खाली उतरला. पावसामुळे सर्व्हिस रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे ट्रक रस्त्याशेजारी उलटला. ट्रकच्या चालक व वाहकाने प्रसंगावधान ओळखून ट्रकमधून उडी घेतली, त्यामुळे सुदैवाने ते बचावले. देव्हाडी एमआयडीसीशेजारी राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर मोठे वळण आहे विरुद्ध दिशेने येणारे जलद वाहन दिसत नाही. त्यामुळे स्थळ हे अपघात प्रवण ठरले आहे.
तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम होऊन एक वर्ष उलटले तरी अजूनपर्यंत सर्व्हिस रस्ता रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम अपूर्ण आहे. रस्त्याशेजारील गावातील नागरिकांना घरी येण्या-जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला माती भरण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूचा सर्व्हिस रस्ता हा अद्यापही पोकळच आहे. रस्त्याच्या बाजूला वाहने गेल्यावर ते रस्त्यात रूतून अनियंत्रित होतात. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तत्काळ मजबूत सर्व्हिस रस्ता बांधकाम करण्याची गरज आहे.