कोका अभयारण्यातील वनतलाव कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:31 AM2018-11-16T00:31:21+5:302018-11-16T00:32:00+5:30
यंदाच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. हिवाळा जेमतेम सुरु झाला असतांनाच कोका अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला.
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : यंदाच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. हिवाळा जेमतेम सुरु झाला असतांनाच कोका अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र, दहा किमी परिसरातील उंच दऱ्याखोऱ्यातून जलसंचय होणारा सोनकुंड वनतलाव कोरडा झाला. तर राजडोह तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय झाला असून वन्यजीवांची भटकंती सुरू झाली आहे. यातून मानव आणि वन्यप्राणी यांचा संर्घष होण्याची भीती आहे.
कोका वन्यजीव अभयारण्याची निर्मिती सन २०१३ मध्ये करण्यात आली. त्यामुळे वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळाला. परिणामी जंगलात वन्यजीवांची संख्या झपाट्याने वाढली. सोयीसुविधा उभारण्यावर व पर्यटनाला चालना देण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे वन्यजीव व मानव यातील संघर्ष पराकोटीला पोहचण्याचा अंदाज आहे. अभयारण्यातील महत्वपूर्ण वनतलावांत, बोड्यात, नाल्यांत पाण्याचा ठणठाणाट आहे. जानेवारी २०१९ पर्यंतही पुरेल एवढे पाणी तलावांत दिसून येत नाही. अभयारण्यातील बहुतेक मोठ्या तलावांची हीच अवस्था आहे. मागील वर्षी साकोली ते पालोरा राज्यमार्गालगत असलेल्या सोनकुंड वनतलावांचे खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. लाखोंचा खर्च यावर करण्यात आला. मात्र, खोलीकरण झालेल्या भागातही पावसाचे पाणी साठविलेले नाही. या तलावात जंगलटेकडींच्या दहा किमी परिसरातील पाण्याचा जलसंचय होत असतांनाही भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय असून वनधिकाऱ्यांनी आतापासूनच त्यावर उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.
अभयारण्याच्या बफरझोनमध्ये वन्यजीवांमुळे भीतीचे वातावरण आहे. मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाळीव प्राण्यांचा फडसा व मनुष्यहाणीला सुध्दा सामोरे जावे लागत आहे. नागरीक सायंकाळी दहशतीत जीवन जगण्यास मजबूर आहेत. आता तर पाण्याच्या शोधात व्याकूळ वन्यजिव गावकुसात शिरण्याची भीती आहे. त्यातून नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. यासाठी उपाय योजण्याची गरज आहे. तसेच नागरिकांना दिलेले रोजगार निर्मितीचे व अन्य सोयीसुविधांचे आश्वासन पुर्ण करण्यात शासन-प्रशासन अपयशी ठरल्याची बोंब गावागावात आहे.
शेतकऱ्यांपुढे भीषण दुष्काळाचे संकट
गत दोन वर्षांपासून कोरड्या दुष्काळाचा सामना जिल्ह्याला करावा लागत आहे. यावर्षीही शेतकऱ्यांसमोर भीषण दुष्काळाचे संकट आहे. शेतकºयांनी केलेली मेहनत मातीज गेली. एका पाण्याचे हजारो एकर शेतीचे धानाचे पीक वाळले. पेरणी, नागरटी, खत, किटकनाशके, मंजुरीचा पैसा शेतकऱ्यांच्या माथ्यावर बसला. परंतू अजूनही शासन-प्रशासनाने नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे व मदतीचे आदेश दिलेले नाहीत. शासन शेतकऱ्यांच्या नावाने विविध योजनांची घोषणा करीत असला तरी जमिनीवरील परिस्थिती वेगळीच आहे. कर्जमाफी, पीकविता या बाबीच आता शेतकºयांना जाचक वाटू लागल्या आहेत.