कोरोनाच्या सावटातही घरोघरी उभारल्या नव चैतन्याच्या गुढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:32+5:302021-04-14T04:32:32+5:30
भंडारा शहरात शनिवार, रविवारच्या दिवशी वीकेंड लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर, गुडीपाडवा आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची ...
भंडारा शहरात शनिवार, रविवारच्या दिवशी वीकेंड लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर, गुडीपाडवा आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होणार, असे वाटत होते. मात्र, अनेकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडणे टाळले. सणासाठी लागणारे बांबू, फुले, कपडे, तसेच फुलांचे हार, कडुनिंबाची पाने, फुलांचे हार विक्री करताना किरकोळ विक्रेते भंडारा शहरात दिसून आले. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही अनेकांना गुढीपाडवा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत अनेकांनी आपल्या घरी गुढ्या उभारल्या. मात्र, या वर्षी कपडे खरेदीसह सोने, वाहन, घर खरेदीसाठी मात्र बाजारात फारसा उत्साह असल्याचे चित्र दिसून आले नाही.
बॉक्स
श्री राम जन्मोत्सवाचा उत्सव यंदा साधेपणाने
विविध सणांतून विश्व बंधुत्वाचा संदेश दिला जातो. गुढीपाडवा सण म्हणजे नवचैतन्य. चैत्र मासारंभ होत असतानाच येणारा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रभू श्रीराम चंद्र हे वनवासातून परतले, तेव्हा त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आयोध्या नगरीत अनेकांनी गुड्या उभारून, तोरणे लावून श्रीरामचंद्रांचे स्वागताचा आनंद साजरा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत गुढीपाडवा हा सण साजरा केला जात आहे. देशभरात अनेक ठिकाणी आजही श्री राम जन्मोत्सवाचा उत्सव सुरु होतो. तसेच निसर्गातही अनेक नैसर्गिक बदलही याच काळात दिसून येतात. सर्व ऋतूंचा राजा असणारा वसंत ऋतुचे आगमन याच काळात होते. त्यामुळे नवा उत्साह, नवी आशा, नवा आकांक्षाच्या गुढ्या, तोरणे, तसेच एक मानवी मनामध्ये नवचैतन्य प्रफुल्लित करण्याचे काम या गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने होते. म्हणूनच मराठी नववर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा सण चांगल्या कामाचा शुभारंभही समजला जातो. त्यामुळेच गुढीपाडवा हा सण संपूर्ण भारतात आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, या वर्षी कोरोनामुळे साधेपणाने साजरा करावा लागला.