आचारसंहिता होणार कडक ; जिल्ह्यात १४४ कलम लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:37 PM2024-10-17T13:37:17+5:302024-10-17T13:38:10+5:30
शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी; विनापरवानगी लाउडस्पिकर नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४ अन्वये अधिकाराचा वापर करून विविध बाबींवर निर्बंध आदेश जारी केले आहेत.
लाउडस्पिकर बंदी
कोणतीही व्यक्ती, संस्था पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरून धावत असताना त्यावर ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी ६:०० वाजेपूर्वी आणि रात्री १०:०० वाजेनंतर करता येणार नाही. हे आदेश जिल्ह्यासाठी २५ नॉव्हेंबरपर्यंत अंमलात राहतील.
विश्रामगृह वापरावर निर्बंध
निवडणूक कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे याठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्याग्रह करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्ये वाजविणे किंवा गाणी म्हणणे, इत्यादी कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.
मालमत्तेचे विद्रूपीकरण नको
शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्ता विद्रूप करण्यास निर्बंध लावण्यात आले असून, निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रूपता करण्यास, बॅनर, फ्लॅक्स लावण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
शस्त्रास्त्रे बंदी
निवडणुकीच्या कालावधीत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्या २० सप्टेंबर २०१४च्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारकांव्यतिरिक्त इतर सर्व परवानाधारकांस परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास व शस्त्र बाळगण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे.