बोचऱ्या थंडीची चाहूल; गावोगावी पेटल्या शेकोट्या
By admin | Published: November 14, 2016 12:32 AM2016-11-14T00:32:20+5:302016-11-14T00:32:20+5:30
जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची चाहूल सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या बोचऱ्या थंडीमुळे अनेकांना हुडीहुडी भरली आहे.
ऊनी कापडाची दुकाने सजली : स्वेटर, मफलर, जर्किन निघाले कपाटाबाहेर
भंडारा : जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची चाहूल सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या बोचऱ्या थंडीमुळे अनेकांना हुडीहुडी भरली आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात चौकाचौकांत शेकोट्या पेटण्यासाठी सुरूवात झाली आहे. अनेक नागरिक मफलर व स्वेटरचा वापर सुरू झाला आहे.
मागील काही दिवसांत दक्षिणमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडील हवेचा प्रभाव कमी असून येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर हा बोचऱ्या थंडीचा महिना मानला जातो.
साधारणत: दरवर्षी दिवाळीनंतर बोचऱ्या थंडीला सुरूवात होते. मात्र दोन ते तीन दिवसांपासून थंडी वाढली आहे. सायंकाळ होताच वातावरणात गारवा जाणवू लागतो. थंडी आरोग्याला लाभदायक असते. थंडीमुळे फुलझाडांना, फळझाडांना बहर येतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान थोर मंडळी स्वेटर, जर्किन, मफलर टोपी, चारदर, घोंगडी याचा उपयोग करताना दिसून येत आहे. वाढत्या थंडीमुळे लोक अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवत आहे.
ग्रामीण भागात काही ठिकाणी रबी पेरणीचा हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देत आहे. त्यामुळे थंडीमुळे गरम कपड्यांची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागाचा विचार करता ही थंडी ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलणारी ठरेल, अशी आशा निर्माण झाली आहे. जेवढी थंडी जास्त तेवढा रबीचा हंगाम उत्तमरीत्या येऊ शकतो, असा बळीराजाचा अनुभव आहे.
दुकाने सजली
शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी उनी कापडांची दुकाने थाटली आहेत. थंडीत वाढ होत असल्याने या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.
(प्रतिनिधी)