थंडी आली रे...
By Admin | Published: November 19, 2015 12:23 AM2015-11-19T00:23:01+5:302015-11-19T00:23:01+5:30
जिल्ह्यात हळूहळू बोचऱ्या थंडीची चाहुल सुरू झाली आहे.
पारा १८ अंशावर : दोन दिवसांनंतर थंडी वाढण्याची शक्यता
भंडारा : जिल्ह्यात हळूहळू बोचऱ्या थंडीची चाहुल सुरू झाली आहे. अद्यापही अपेक्षित थंडीला सुरुवात झाली नसली तरी पुढील दोन दिवसांत मात्र थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान खात्यानुसार, मागील काही दिवसांत दक्षिणमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे उत्तरेकडील हवेचा प्रभाव कमी झाला असून भंडाऱ्यातील तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. मात्र पुढील दोन दिवसांत थंडी वाढण्याची दाट शक्यता आहे. सोमवारला भंडाऱ्यात कमाल ३२ व किमान १८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यातुलनेत मागील तीन वर्षात मात्र नोव्हेंबरमध्ये १३ अंशापर्यंत तापमानात घट झाली होती. प्राप्त आकडेवारीनुसार १७ नोव्हेंबर २०१२ रोजी तापमान १२.२ अंशापर्यंत खाली घसरले होते. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी १२.४ आणि १९ नोव्हेंबर २०१४ रोजी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यातुलनेत यंदा १५ नोव्हेंबरपर्यंत तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. नोव्हेंबर हा गुलाबी थंडीचा महिना मानला जातो. साधारणत: दरवर्षी दिवाळीनंतर बोचऱ्या थंडीला सुरुवात होते. परंतु यंदा त्या थंडीला सुरुवात झालेली नाही. परंतु चाहुल सुरू झाली आहे. सायंकाळ होताच वातावरणात गारवा जाणवू लागतो. (प्रतिनिधी)