जिल्ह्यात थंडीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:59 PM2017-12-30T23:59:50+5:302017-12-31T00:00:01+5:30
चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.
चंद्रपूर जिल्हा तसा तप्त उन्हाळ्यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात बाहेर जिल्ह्यातील नागरिक चंद्रपुरात यायला घाबरतात, एवढी उन्हाची दाहकता असते. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. मात्र त्यानंतर पावसाळ्याने ऋतुचक्राला बगल दिली. प्रारंभी दमदार आलेला पाऊस पुढे कुठे गायब झाला, कळले नाही. पावसाने जिल्ह्यात सरासरीही गाठली नाही. अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्याने दगा दिला. त्यामुळे मागील वर्षीसारखा हिवाळाही दगा देईल, असे वाटत होते. प्रारंभी तसे वाटायलाही लागले. मात्र पुढे चांगली थंडी पडू लागली. हिवाळ्यात चांगली थंडी पडत असल्याने रबी पिकांना त्याचा फायदा होत आहे.
एरवी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र यावेळी दिवाळी आॅक्टोबर महिन्यातच आल्यामुळे थंडी जाणवली नाही. उलट उन्ह तापत असल्याने अनेकांनी घरातील कुलर काढलेच नाही. नोव्हेंबर महिन्यातही थंडीचा फारसा जोर नव्हता. दुपारचा उकाडा कायम होता. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थोडीफार गुलाबी थंडी जाणवू लागली. मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीचा अचानक जोर वाढला. डिसेंबरच्या पंधरवाड्यात तर पारा चांगलाच खाली आला होता. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास कडाक्याची थंडी जाणवू लागली होती.
मात्र मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास जाणवणारी थंडी आता दिवसभरही जाणवत आहे. चौकाचौकात नागरिक उन्हात उभे राहताना दिसत आहे. शनिवारी चंद्रपुरात १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसेंदिवस पारा आणखी खाली घसरत आहे.
ग्रामीण भागात शेकोट्या
ग्रामीण भागात तर थंडीचा जोर अधिक आहे. ब्रह्मपुरीत शनिवारी ९.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील चौकाचौकात शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याशिवाय एरवी पहाटे
५ वाजताच आपली दिनचर्या सुरू करणारे ग्रामीण नागरिक आता सकाळी ७ वाजता
उठू लागले आहेत.