बदलत्या वातावरणाचा परिणाम; सर्दी, खोकल्याचा रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 04:50 PM2022-01-07T16:50:15+5:302022-01-07T17:00:19+5:30
आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच आजाराच्या रुग्णांचीही सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी वाढत आहे.
भंडारा : कधी ऊन तर कधी पाऊस, यामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे(Climate Change) लोकांवर वातावरणाचा परिणाम झाला. घरोघरी सर्दी(cold), खोकला(cough) आणि ताप(fever) अशी लक्षणे आढळणारे रुग्ण घरोघरी दिसू लागली आहेत. कोरोनाही पाय पसरू लागला आहे. आपल्याला कोरोना तर झाला नाही, या धास्तीत लोक आहेत. आजघडीला मेडिकलमध्ये सर्दी, खोकल्याची औषधे घेणारे लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत.
भंडारा शहराबरोबर ग्रामीण भागातही व्हायरल फिव्हरचा जोर असल्याने, गावागावात सर्दी-तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाऊस फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. गत आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच आजाराच्या रुग्णांचीही सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी वाढत आहे.
शासकीय रुग्णालयातील ओपीडी वाढली
- साधी सर्दी, खोकला किंवा ताप रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याने, जिल्हा रुग्णालयातील ओपीडी वाढली आहे.
- ताप असलेल्या व्यक्तीने घरच्यांपासून वेगळे राहावे, लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करून घ्यावी, आरोग्य यंत्रणेचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावा.
...तर करा कोरोना चाचणी
सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळताच, कोरोनाची चाचणी करण्यासाठी लोकांनी पुढे यावे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वेच्छेने लोक रुग्णालयात आले, तरच त्यांची चाचणी केली जाते. दिवसाकाठी दररोज ४०० लोकांची चाचणी भंडारा जिल्ह्यात केली जात आहे.
बदललेले वातावरण हेही कारण
सद्यस्थितीत ऊन, पाऊस, मधेच थंडी असा सतत बदल वातावरणात होत असल्यामुळे या वातावरणाचा फटका मानवी शरीरावर पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.