जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षक मध्यरात्री धडकले रेतीघाटावर; ११ ट्रॅक्टर जप्त, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 04:04 PM2022-05-04T16:04:39+5:302022-05-04T18:25:52+5:30

प्रशासनाच्या या कारवाईने रेतीतस्करांत आता धडकी भरली आहे.

Collector-Superintendent of Police raids on Wadegaon Sand Ghat at midnight, 11 tractors seized, two arrested | जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षक मध्यरात्री धडकले रेतीघाटावर; ११ ट्रॅक्टर जप्त, दोघांना अटक

जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षक मध्यरात्री धडकले रेतीघाटावर; ११ ट्रॅक्टर जप्त, दोघांना अटक

Next
ठळक मुद्देप्रशासन ॲक्शन मोडवर : वडेगाव रेतीघाटावर कारवाई

भंडारा : उपविभागीय अधिकाऱ्यांवर रेती तस्करांनी हल्ला केल्यानंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगळवारी मध्यरात्री भंडारा तालुक्यातील वडेगाव रेतीघाटावर धडकले. प्रशासनाचा फौजफाटा पाहताच रेती तस्कर वाहन सोडून पसार झाले. ११ ट्रॅक्टर जप्त करून दोन रेती तस्करांना अटक करण्यात आली. प्रशासनाच्या या कारवाईने रेतीतस्करांत आता धडकी भरली आहे.

उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्या पथकावर पवनी तालुक्यातील बेटाळा येथे गत बुधवारी पहाटे ३.३० वाजता तब्बल २२ रेती तस्करांनी हल्ला केला होता. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. हल्लेखोर रेती तस्कारांना अटकेची कारवाई सुरू असून, आता जिल्हा प्रशासनाने रेती तस्कराविरुद्ध कंबर कसली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव भंडारा तालुक्यातील कुप्रसिद्ध वडेगाव रेतीघाटावर धडकले.

भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, तहसीलदार अरविंद हिंगे वडेगाव घाटावर दाखल झाले. कारधाचे ठाणेदार राजकुमार थोरात आपल्या पथकासह पोहचले. अधिकारी कारवाईसाठी आल्याचे पाहताच रेतीतस्करांनी वाहन सोडून पळ काढला. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र कुणीही हाती लागले नाही. पहाटे ४.३० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. सर्व ११ रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. दोन ट्रॅक्टर कारधा पोलीस ठाण्यात तर, नऊ ट्रॅक्टर एसटी कार्यशाळेत जमा करण्यात आले.

कारधा पोलिसांनी जयदेव बोरकर (३५, रा. बेरोडी) आणि महेंद्र हजारे (२१, रा. सुरेवाडा) यांना अटक केली. फावडे, घमेले, ट्रॅक्टर असा ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अलीकडच्या काळात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी रेतीघाटावर धाड मारण्याची ही पहिलीच घटना असावी.

हे आहेत जप्त केलेले ट्रॅक्टर

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी धाड टाकल्यानंतर तस्कर आपले ट्रॅक्टर सोडून पसार झाले. घटनास्थळावर ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ झेड २५१३, एमएच ३६ झेड ७३२७, एमएच ३६ झेड ८८५५, एमएच ३६ जी ३२३०, एमएच ३६ एल ६८५२, एमएच ३५ जी ५९५, एमएच ३६ झेड ५६०८, एमएच ३५ जी ९०९३ आणि विना क्रमांकाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या ट्रॅक्टर मालकांचा आता शोध घेतला जात आहे.

Web Title: Collector-Superintendent of Police raids on Wadegaon Sand Ghat at midnight, 11 tractors seized, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.