आईऽऽ.. तो धूर बंद कर ना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:00+5:302021-01-13T05:32:00+5:30
आम्हाला घ्यायला कुणी येतच नाहीये. तू ये ना आई... प्लीज. ‘का गं, कट्टी केलीयस का तू माझ्याशी? माझी काय ...
आम्हाला घ्यायला कुणी येतच नाहीये. तू ये ना आई... प्लीज.
‘का गं, कट्टी केलीयस का तू माझ्याशी? माझी काय चूक झालीय का? तुला खूप त्रास दिला का मी? पण मी? तर आताशी कुठे जन्म घेतलाय... रडलेही नव्हते. आई, तुला नीट पाहिलंही नाही गं. तू पाहिलंस का मला? तू ये ना गं आई... प्लीज.
आई, निदान त्या डॉक्टर काकांना तरी पाठव ना... त्या मला औषध देणाऱ्या नर्सताई पण इथं नाहीत. कुठे गेले सगळे. कित्ती धूर झालाय सगळा. आम्हाला काहीच दिसत नाहीये. आता श्वासही घेता येईना. आई ये की गं... प्लीज.
पण माझा रडण्याचा आवाज तुला येत नसणार ना! इवलुसा आवाज माझा. कुठेच पोचेना झालाय गं. माझी ‘कीव कीव’ या रूमच्या बाहेरही जाईना आणि कुणी इकडेही फिरकेना. ये की गं आई.. प्लीज.
आता माझं काही खरं नाही. जीव गुदमरला माझा. श्वास घेता येईना. काय करू मी... कुणी आहे का? माझ्या आई-पप्पांना बोलवा प्लीज. कुणीतरी या ना. बघा ना आम्हाला... नाहीतर आम्ही मरून जाऊ!
ऐक ना आई, मी माझ्या पप्पांना अजून नाही बघितलं. त्यांनीही मला नाही बघितलं. त्यांचा स्पर्श मला मिळेल का? आई, बोल ना! का गं इतकी खट्टू झालीस. मी नकोय का तुला? पण तू तर किती हॅपी होतीस माझ्या जन्मानं. तुझे ते पाणावलेले डोळे बघितले होते मी. माझ्या छोटुशा हाताची मूठ सोडवली होतीस... तळहातावरच्या रेषा बघत होतीस. काय कळलं तुला? काय माहीत... पण जाम खूश होतीस तू. आणि मीही. बट आज तुला? इतकी झोप कशी गं लागली? आता मला तुझी जास्त गरज होती बघ. बोल ना... प्लीज.
बरं आई झोप तू. नाही तुला त्रास देणार. तसंही आता मी जिवंत राहत नाही बघ. माझा शेवटाचा प्रवास सुरू झाला. किती छोटा प्रवास होता ना माझा. देवानं का जन्म दिला असेल गं मला? काही बघायच्या आतच डोळे बंद करतोय तो माझे. दुष्ट कुठला. आता किती त्रास होईल तुला, त्याचंच टेन्शन आलंय बघ. पण आई तू रडू नको... स्वतःला त्रास करून घेऊ नको. मी जातो आलेल्या मार्गाने.
आई, शेवटचं एक सांगतो. त्या पुढारी काकांना म्हणावं, आमच्या दुःखाचं राजकारण करू नका. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेवर लक्ष द्या म्हणावं. आम्ही दहा जण तर देवाघरी गेलोच आहोत, पण उरलेल्या सात जणांवर आणि त्यानंतर जन्माला येणारांवर नीट उपचार करा म्हणावं. तरच आम्ही वरती आनंदात राहू.
बाय..बाय...आई-पप्पा
तुमचं
(नावही नसलेलं पिल्लू)
(भंडाऱ्याच्या दुर्दैवी घटनेतील चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.)
मन हेलवाणाऱ्या या घटनेबाबत उपरोक्त लिखाण कुणी केले व सोशल मीडियावर कुणी अपलोड केले आम्हाला माहीत नाही. परंतु मानवी संवेदनाची ही शब्दकृती आम्ही प्रकाशित करीत आहोत.