दिलासा! गोंदिया रेल्वेस्थानकाच्या रेलटोलीकडील पादचारी पूल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:21+5:302021-06-25T04:25:21+5:30
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, तसेच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोंदिया रेल्वेस्थानकावरील रेलटोली भागातील पादचारी उड्डाणपूल ...
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, तसेच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोंदिया रेल्वेस्थानकावरील रेलटोली भागातील पादचारी उड्डाणपूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता संसर्ग आटोक्यात असून, हा पूल पुन्हा प्रवाशांसाठी सुरू करण्याची सूचना खा. प्रफुल्ल पटेल यांनी रेल्वे विभाग आणि जिल्हा प्रशासनाला केली होती.
याची दखल घेत जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी रेलटोली परिसरातील पादचारी पूल सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाला दिले. त्यानंतर हा पूल बुधवारपासून (दि. २३) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला.
रेलटोली परिसरातील पादचारी पुलावरून बालाघाट आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेस्थानकावर त्वरित पोहोचण्यास मदत होते. मात्र, रेलटोली परिसरातील पादचारी पूल गोंदिया रेल्वे विभागाने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मागील तीन महिन्यांपासून बंद केला होता.
यामुळे १ कि.मी.चा फेरा मारून स्थानकावर पोहोचावे लागत होते. त्यामुळे बऱ्याचदा गाडीसुद्धा सुटून जात होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. आता कोरोना संसर्ग आटोक्यात आला आहे. रेलटोली परिसरातील पादचारी पूल प्रवाशांसाठी पूर्ववत सुरू करण्यात यावा संदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, तसेच डेली मूव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनीसुद्धा जिल्हाधिकारी खवले यांच्याकडे हा पूल सुरू करण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकारी खवले यांनी रेल्वे वाणिज्यिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा पादचारी पूल प्रवाशांसाठी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बुधवारी हा पादचारी पूल सुरू करण्यात आला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.