जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:10 PM2017-08-16T23:10:57+5:302017-08-16T23:11:24+5:30
शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम, डिजीटल शाळा अशा विविध क्षेत्रात जिल्हयाने आघाडी मिळविली असून येत्या काळात जिल्हयाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबध्द होऊ या, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते.
पोलीस कवायत मैदान येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी परेड निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.
शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून कर्जात असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील ४७ हजार शेतकºयांना ३११ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफीपासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही.
याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैअखेर जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँक मिळून ६० हजार ६०० शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला असून यापोटी चार कोटी ८८ रुपयाचा पीक विम्याचा हप्ता भरला आहे, असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
शेतीच्या सुपिकतेसोबतच उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात भंडारा जिल्हयात समाधानकारक काम झाले असून संपूर्ण लोकसहभागातून जिल्हयातील ५२ तलावातून ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला असून यामुळे तलावाच्या पाणी पातळीत नक्की वाढ झाली असून जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.