भंडाऱ्याच्या विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:52 AM2018-08-17T00:52:56+5:302018-08-17T00:53:44+5:30
महाराष्ट्र शासनाने मागील चार वर्षात भंडारा जिल्हा विकासासाठी भरीव कार्य केले असून जलयुक्त शिवार, शेतकरी सन्मान योजना, आरोग्य, शिक्षण, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, महसूल प्रशासन व कृषि क्षेत्रात विकासाला नवी दिशा दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र शासनाने मागील चार वर्षात भंडारा जिल्हा विकासासाठी भरीव कार्य केले असून जलयुक्त शिवार, शेतकरी सन्मान योजना, आरोग्य, शिक्षण, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, महसूल प्रशासन व कृषि क्षेत्रात विकासाला नवी दिशा दिली आहे. यापुढेही शासन जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे व विविध विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून कर्जात असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६५ हजार २८५ शेतकºयांना १८२ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ५५ हजार ४०६ शेतकºयांना २७६ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
ना. जानकर म्हणाले, तुडतुडा रोगाच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांच्या नुकसानीसाठी शासनाने मदत जाहिर केली. प्रशासनाने जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार २८८ शेतकºयांच्या बँक खात्यात ६२ कोटी ७१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार २६३ भूमीधारी शेतकरी कुटुंब भूमीस्वामी होणार आहेत. यापैकी एक लाख ११ हजार ९२६ गट वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत करण्यात आले आहे. उर्वरित गटांची प्रक्रिया वेगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील तीन वर्षात जिल्ह्यातील २०१ गावात जलयुक्त शिवारची कामे घेण्यात आली. त्यापैकी १८७ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. मागील दोन वर्षात झालेल्या कामांमुळे ८१ हजार ५३९ टिसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे. यामुळे ३८ हजार ३२३ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. एका पाण्याने वाया जाणाºया धानाला जलयुक्त शिवारमुळे संजिवनी मिळाली आहे. या कामामुळे जलस्तर वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. वैरण विकासावर भर देण्यासाठी आत्मांतर्गत १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बाग तसेच आझोला युनिट तयार करण्यात आले आहे. त्यापासून शेतकºयांना वैरण लागवडी करीता वैरण ठोंब्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील तीन वर्षात ७ हजार ७०० कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री हरघर बिजली सौभाग्य योजनेत जिल्ह्यातील ८ हजार ४०० लाभार्थ्यांना नवीन वीज जोडणी देण्यासाठी ५ कोटी ९४ लाखाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. लवकरच या लाभार्थ्यांच्या घरात वीजेचा प्रकाश पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने युवा माहिती दूत हा उपक्रम सुरु होत आहे.
जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत १२२३ गावांमध्ये फिरते पोलीस ठाणे उपक्रम घेण्यात आला यामध्ये ५८ हजार लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी २५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रांरभी पोलीस विभागाच्या वतीने पथ संचलन करण्यात आले. यावेळी विविध विभागाच्या वतीने चित्ररथ काढण्यात आले.