लाखनीत विवाहितेवर बळजबरी
By Admin | Published: January 29, 2017 12:49 AM2017-01-29T00:49:53+5:302017-01-29T00:49:53+5:30
विवाहिता घरात स्वयंपाक करीत असल्याची संधी साधून एका इसमाने आत प्रवेश केला. यावेळी त्याने
दोघांना अटक : आरोपी मायक्रो फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी
भंडारा : विवाहिता घरात स्वयंपाक करीत असल्याची संधी साधून एका इसमाने आत प्रवेश केला. यावेळी त्याने मुलांना धमकावून घराबाहेर काढले. यानंतर त्याने विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केला. ही घटना लाखनी तालुक्यातील पोहरा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
तुषार रामंचद्र बुरडे (३१) व उपेंद्र जांभूळकर रा. काटी ता. मोहाडी असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही घटना २३ च्या रात्री ८ वाजता घडली. लाखनीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार हा मायक्रोफायनान्स कंपनीत प्रतिनिधी आहे. महिलांचे बचत गट तयार करून त्यांना कर्ज देणे व त्यांची रक्कम वसूल करण्याची जबाबदारी तुषारकडे आहे. पीडित विवाहितेच्या पतीचा गावातच पानठेला व्यवसाय आहे.
तुषार याचे कंपनीच्या कामानिमित्य पोहरा येथे नेहमी जाणे-येणे असायचे. यातून त्याची ओळख पीडितेच्या पती व यानंतर पीडितेशी झाली. त्यानंतर तुषारचे पीडितेच्या घरी नेहमी जाणे-येणे वाढले. दरम्यान घटनेच्या दिवशी पीडितेचा पती नित्याप्रमाणे पानठेल्यावर असताना रात्री ८ वाजताच्या सुमारास लहान मुले घरात अभ्यास तर पीडिता ही स्वयंपाक करीत होती.
यावेळी आरोपी तुषार हा त्याचा मित्र उपेंद्र जांभूळकर याच्यासह पोहरा येथे पीडितेच्या घरी पोहचला. त्यानंतर तो स्वयंपाक घराच्या मागील दारातून आत प्रवेश करून त्याने पीडितेला जबरदस्तीने कवटाळले. दरम्यान त्याने मुलांना धमकावून घराबाहेर काढले. यानंतर विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केला.
सदर बाब तिने रात्री पती घरी आल्यानंतर त्यांच्याजवळ कथन केली. याप्रकरणी पीडितेने २४ जानेवारीला आरोपी तुषार बुरडे व उपेंद्र जांभूळकर यांच्याविरूध्द लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवून गुरूवारला तुषार व उपेंद्र या दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल कुमरे हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)