सक्षम उपक्रम राज्यभर राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:05 PM2018-01-08T22:05:13+5:302018-01-08T22:05:40+5:30
जिल्हा प्रशासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत मूल्य व कौशल्यावर आधारित तयार केलेला 'सक्षम' हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे राज्याचे कौशल्य विकास खात्याचे राज्यमंत्री ना.रणजीत पाटील यांनी सांगितले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा प्रशासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत मूल्य व कौशल्यावर आधारित तयार केलेला 'सक्षम' हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे राज्याचे कौशल्य विकास खात्याचे राज्यमंत्री ना.रणजीत पाटील यांनी सांगितले. हा उपक्रम केवळ विद्यार्थीच नाही तर प्रशासनाला सुद्धा 'सक्षम' करणारा आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या संकल्पनेतुन तयार करण्यात आलेला हा उपक्रम महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास ना. पाटील यांनी व्यक्त केला.
कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, भंडारा यांच्या वतीने मोहाडी येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रचलित अभ्यासक्रमासोबत २१ कौशल्य व १० मूल्य असलेला सक्षम उपक्रम जिल्हा प्रशासनाने नुकताच तयार केला आहे. हा उपक्रम केवळ नाविन्यपूर्ण नाही तर शौक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देणारा आहे. सक्षम राज्यभर लागू केल्यास कौशल्य प्रवीण विद्यार्थी घडविण्यासाठी मदत होईल, असे सांगून आमदार चरण वाघमारे यांनी सक्षम उपक्रम राज्यभर राबविण्यात यावा, अशी मागणी राज्यमंत्री रणजीत पाटील यांना केली.
आमदार चरण वाघमारे यांच्या भाषणाचा धागा पकडून ना. रणजीत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. केवळ पुस्तकीय शिक्षण घेऊन चालणार नाही, शिक्षणाला कौशल्याची जोड आवश्यक आहे. या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने तयार केलेला सक्षम उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सक्षमबद्दल माहिती दिली. स्वच्छता व निटनेटकेपणा, वक्तशिरपणा, संवेदनशिलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, सौजन्यशिलता, सर्वधर्म सहिष्णुता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रिय एकात्मता व राष्ट्रभक्ती ही १० मुल्य या उपक्रमात आहेत. वाटाघाटी, उत्कृष्टता, संघर्ष व्यवस्थापन, निर्णयक्षमता, ताणतणावाचे व्यवस्थापन, डिजीटल नागरिकत्व, उद्योजकता, जिज्ञासा, दृश्यक्षमता, नेतृत्व पुढाकार, कल्पना निर्मिती, समस्या निराकरण, चिकित्सक विचार प्रणाली, प्रणाली विचार, माहिती साक्षरता, पार्श्विक विचार, नव निर्मिती, समानुभूती, लवचिकता, स्वचा विकास, अनुकूलता अशा २१ कौशल्यांचा अंर्तभाव सक्षम उपक्रमात केल्या गेला आहे. आता हा उपक्रम राज्य स्तरावर लागू होणार आहे. ही बाब जिल्ह्यासाठी गौरवाची असणार आहे.
सक्षममध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय, संवादाचे कौशल्य, अभिव्यक्तीचे कौशल्य आत्मसात करण्यावर भर देण्यात येणार आहे. सक्षम हा केवळ शैक्षणिक उपक्रम नसून भंडारा जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने सक्षम अंतर्गत उपक्रम राबविले जाणार आहेत.
यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेण्याचे मान्य केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे २५ शिक्षकांची समिती सुध्दा कार्यरत असणार आहे.
सक्षमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रचलित अभ्यासक्रमासोबतच सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. सुरुवातीला हा कार्यक्रम जिल्हयातील १३५ शाळांमध्ये राबविला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने हा उपक्रम जिल्हयातील सर्व शाळांमध्ये राबविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. यासाठी शिक्षकांनी स्वत:हून तयारी दाखविली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा तसेच अंगभूत गुणवत्तेचा विकास व त्यावर आधारित भावी पिढी निर्माण करणे हा सक्षमचा उद्देश आहे.