भंडारा रोड रेल्वेस्थानकावर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:47 PM2019-05-08T21:47:58+5:302019-05-08T21:49:04+5:30
वर्षभरापूर्वी भंडारा रोड रेल्वे स्थानक असुरक्षित म्हणून ओळखले जात होते. परिसरातील गावगुंडांचा हैदोस, प्रवाशांची लूट, महिलांची छेड येथे नित्याची बाब झाली होती. या स्थानकावर रात्री जाताना अंगावर काटा येत होता. सायंकाळ होताच स्थानकावर स्मशान शांतता असायची.
तथागत मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : वर्षभरापूर्वी भंडारा रोड रेल्वे स्थानक असुरक्षित म्हणून ओळखले जात होते. परिसरातील गावगुंडांचा हैदोस, प्रवाशांची लूट, महिलांची छेड येथे नित्याची बाब झाली होती. या स्थानकावर रात्री जाताना अंगावर काटा येत होता. सायंकाळ होताच स्थानकावर स्मशान शांतता असायची. दोन नंबरचा फलाट तर कर्दनकाळ होता. मात्र अलिकडेच रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे सुरु केले. परिस्थिती बदलत गेली. आता हा परिसर भयमुक्त झाला असून प्रवाशांसाठी सर्वाधिक सुरक्षित रेल्वे स्थानक म्हणून त्याची ओळख होत आहे.
दोन दशकांपूर्वी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल हटविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. सुरक्षा सांभाळणारी यंत्रणा नसल्याने प्रवाशांना लुटले जायचे. रेल्वे स्थानकावर जाणे म्हणजे सुरक्षा धोक्यात घालण्यासारखे झाले होते. मालवाहतूक करणाऱ्या गाड्यातील सामानांची लुट, मारपीट, महिलांसोबत छेडखानी असे प्रकार वाढले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या घरात काही गुंडांनी आपले बस्तान मांडले होते. मात्र वर्षभरापासून येथील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.
जानेवारी २०१८ मध्ये आरपीएफ चौकीचे उद्घाटन करण्यात आले. मार्च २०१८ ला पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी कार्यभार स्वीकारला. गुन्हेगारांवर कारवाईची धडक मोहीम राबविली. गुंडांना वठणीवर आणण्याचे काम त्यांनी केले. लुटमार, पाकीटमार अशा गुन्हेगारांवर त्यांनी वचक आणला. विशेष म्हणजे नागपुरच्या मार्गावर असलेल्या गुंडांची मोठी रेलचेल होती. त्यांना वठणीवर आणून या भागात होणाºया गुन्ह्यांचे प्रमाण शुन्यावर आणण्याचे श्रेय पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना जाते. सुव्यवस्थित नियोजनामुळे रेल्वे स्टेशन भयमुक्त झाले आहे.
वर्षभरात तीन हजार ११९ गुन्ह्यांची नोंद
वर्षभरात विविध गुन्ह्यांतर्गत ३ हजार ११९ प्रकरणे नोंदविण्यात आली. विविध गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींकडून ८ लाख ८४ हजार २९० रुपये दंड वसुल करण्यात आला. नागपूर विभागातील सर्वाधिक दंडाची रक्कम म्हणून नोंद केली जात आहे. भारतीय रेल्वे अधिनियम १४४ अंतर्गत वर्षभरात ३६५ अवैध खाद्यपदार्थ विक्री करणाºया व्हेंडरवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख २१ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. भंडारा रोड रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक जयसिंह, अरविंद टेंभुर्णीकर, भूपेश देशमुख यांना या कार्यासाठी गौरवान्वित करण्यात आले. महिला आरक्षित डब्यात प्रवास करणाºया प्रवाशांकडून १ लाख ८७ हजार दंड वसुल करण्यात आला.
२४ तास करडी नजर
रेल्वे सुरक्षा विभागात कार्यरत जवानांची २४ तास करडी नजर रेल्वे स्थानकावर असते. प्रवासादरम्यान सुटलेल्या मौल्यवान वस्तू, आवश्यक कागदपत्रेही सुखरुप परत करण्याचे काम या विभागाने केले आहे. पोलीस निरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक बी.के. सिंग, जयसिंग, ओ.सी. शेंडे, रितेश देशमुख, कृष्णा सावरकर यासाठी ठोस भूमिका घेत असतात.