वृद्धापकाळ योजनेच्या अर्जदारावर गुन्हा दाखल
By admin | Published: September 29, 2016 12:39 AM2016-09-29T00:39:04+5:302016-09-29T00:39:04+5:30
शासनाच्या संजय गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी सितेपार येथील एका व्यक्तीने खोटे दस्तावेज तयार करून...
मोहाडी तहसीलदारांची कारवाई : अनेक बोगस लाभार्थ्याचे धाबे दणाणले
मोहाडी : शासनाच्या संजय गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी सितेपार येथील एका व्यक्तीने खोटे दस्तावेज तयार करून शासनाला फसविण्याचा प्रकार केल्यामुळे तहसलिदार मोहाडी यांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून यामुळे इतर बोगस लाभार्थ्याचे धाबे दणाणले आहे.
शासनाकडून निराधार, विधवा, अपंग, वृद्ध यांच्यासाठी संजय गांधी योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना दरमहा ६०० रूपये अनुदान देण्यात येतो. मात्र काही व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसताना सुद्धा खोटे दस्तऐवज तयार करून शासनाला फसवितात व लाभ उचलतात असाच प्रकार मोहाडी तहसील कार्यालयात उजेडात आला.
रिमसेन चंद्रभान मेश्राम रा. सितेपार या व्यक्तीने संजय गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला. अर्जासोबत ६५ वर्ष पूर्ण झाल्याचे दर्शविण्यासाठी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर खोडतोड करून जन्म तारीख बदलविली व तो दाखला अर्जासोबत जोडला. या योजनेचे प्रस्ताव मंजुर करण्यासाठी झालेल्या सभेत सदर व्यक्तीच्या जन्म दाखल्यावर समिती अध्यक्षांना व सदस्यांना संशय आला.
त्यांनी संबंधित दाखला मुख्याध्यापकाकडे तपासणी करीता पाठविला असताना सदर दाखल्यावरील जन्म तारीख खोटी असल्याचे आढळले.
संजय गांधी समिती अध्यक्ष डॉ. युवराज जमईवार व समिती सदस्यांच्या आदेशान्वये तहसलिदार मोहाडी यांनी मोहाडी पोलिसात सदर लाभार्थ्याविरूद्ध तक्रार केली. या तक्रारीच्या आधारावर मोहाडी पोलिसांनी रिमसेन चंद्रभान मेश्राम रा. सितेपार विरोधात कलम ४२०, ४६८, ४७१, ५११ भादंवि नुसार गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे. संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यापैकी बहुतेक लाभार्थी हे बनावट दस्तऐवजाद्वारे पात्र ठरविण्यात आले असून संपूर्ण लाभार्थ्यांची चौकशी केल्यास अनेक लाभार्थी अपात्र ठरू शकतात, अशी जनतेत चर्चा आहे. काही वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी हे फक्त ५० ते ५५ वर्षाचे असून त्यांनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे आपली ६५ वर्षे दाखवून या योजनेचा लाभ घेत असल्याचे बोलले जाते. या व्यक्तीच्या प्रथम मुलाच्या जन्म दाखल्याचे जर अवलोकन केले तर त्यांच्या वयाचा अंदाज येवू शकतो त्यामुळे सर्व लाभार्थ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हास्तरावर चौकशीची गरज
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्र सादर करून योजनेचा लाभ घेतल्यचे अनेक प्रकरणे यापूर्वीही उजेडात आली. मात्र राजकीय दबाव व अनास्था याला बळी पडली. वारंवार सांगूनही प्रकरणे दाबण्यात आली. संजय निराधार योजना असो की वृद्धापकाळ योजना, एजंटांच्या माध्यमातून बोगस प्रकरणे तयार करण्याचा गोरखधंदा मागील बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. एकट्या मोहाडी तालुक्यात हा प्रकार घडला, असे नाही. साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा, लाखनी व तुमसर तालुक्यातही बोगस लाभार्थ्यांची मोठी यादी असेल. यासंबंधाने जिल्हा प्रशासनाने शिबिराच्या माध्यमातून असो की सर्वेक्षणाच्या माध्यमातून यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तर मोठ्या प्रमाणात घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळप्रसंगी शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधीही वाचविता येईल व खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ पोहचविता येईल.