कोविड रुग्णाची आर्थिक लूट करून फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:58+5:302021-05-22T04:32:58+5:30
* * *तुमसर येथील प्रकार * डॉक्टरावर गुन्हा दाखल करा * * * *नातेवाईकांची पत्रकार परिषदेत मागणी तुमसर : ...
* * *तुमसर येथील प्रकार
* डॉक्टरावर गुन्हा दाखल करा
* * * *नातेवाईकांची पत्रकार परिषदेत मागणी
तुमसर : येथील आयएमए माजी अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय मानकर यांच्या कुटुंबाची स्थानिक डॉ. कोडवानी यांच्या मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयात आर्थिक लूट करून फसवणूक केली. रुग्णाला बरेच दिवस ताटकळत ठेवून मरणास कारणीभूत ठरल्याने डॉ. गोविंद कोडवानी यांच्यावर मनुष्यवधाचा व आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात केली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषदेतून मृताच्या नातेवाइकांनी केली आहे.
डॉ. अभय मानकर वैद्यकीय अधिकारी होते. त्यांना कोविडची लागण झाली असता कोडवानी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविले. शेवटी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. डॉ. कोडवानी यांचे २० बेडचे कोविड सेंटर असून त्या सेंटरमध्ये डॉ. मानकर यांच्यावर १४ दिवस उपचार झाले. यात डॉ. कोडवानी यांनी शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डॉ. कोडवानी यांनी पूर्णपणे चुकीचे उपचार केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानकर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली असून, डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषदेतून केली.
काेट
लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. डॉ. मानकर माझे गुरू होते. त्यांच्या बाबत असे करणे शक्य नाही. मात्र मला बदनाम करण्याचा दृष्टीने माझे विरोधक मानकर कुटुंबीयांना भडकावत आहेत. माझे बिल एक लाख ४३ हजार ६०० रुपये झाले असून उर्वरित ९१ हजार ४०० रुपये परत देण्यासाठी माझी पत्नी कांचन त्यांच्या घरी गेली होती. परंतु, त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. मी चेक तयार करून ठेवलेला आहे. माझ्याकडे संपूर्ण तपशील नसल्यामुळे मी त्यांना बिल देऊ शकलो नाही.
डॉ. गोविंद कोडवानी, तुमसर