घरकुलांचे काम मिशन मोडवर पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:37+5:302021-03-04T05:07:37+5:30
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा ...
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा मनीषा कुरसंगे, तहसीलदार बोंबर्डे, उपसरपंच गणेश बांडेबुचे उपस्थित होते. उमेदच्या बचतगटाने निर्माण केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शनाला यावेळी त्यांनी भेट दिली. सर्वांना घरकुल अंतर्गत शंभर दिवसांचे महाआवास अभियान राबविण्यात येत असून घरकुलांच्या सर्व योजना त्यात एकत्रित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अपूर्ण घरकुल तातडीने पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश असून यासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे त्यांनी सांगितले.
घरकुल मंजूर झालेले लाभार्थी नियोजित वेळेत काम पूर्ण करत नाहीत ही बाब लक्षात आली असून ग्रामपंचायत सदस्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. घरकुल बांधकामाचा नियमित आढावा घेऊन अपूर्ण असलेल्या घरांची पाहणी करावी. त्याचप्रमाणे घरकुलांच्या निधीची रक्कम वेळेच्या वेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, असे ते म्हणाले. घरकुलांच्या सोबतच शौचालय बांधणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी सुमन निमजे या घरकुल लाभार्थ्यांच्या पूर्ण झालेल्या घराला भेट देऊन पाहणी केली.
आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी उमेदचे बचतगट व रेशीम व्यवसायाचा सुद्धा आढावा घेतला. बचतगट निर्मित उत्पादन उत्कृष्ट असून या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चांगली संधी असून या दिशेने काम करण्यासाठी शासन पुढाकार घेईल, असे त्यांनी सांगितले. बचत गटांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा. केवळ खाद्यपदार्थांपर्यंत मर्यादित न राहता बाजार व मागणी यावर आधारित उत्पादननिर्मितीकडे अधिक कल असावा, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पारंपरिक पीकपद्धतीवर विसंबून न राहता नगदी पीक घ्यावे, असे ते म्हणाले. रेशीम शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
बॉक्स
पिटेसूर ग्रामपंचायतला भेट
तुमसर तालुक्यातील पिटेसूर ग्रामपंचायतीला भेट देऊन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. घरकुल पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीचीसुद्धा जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांना लागणारी प्रमाणपत्र योग्य शहानिशा करून वेळेत प्रदान करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याठिकाणी सुद्धा त्यांनी बचतगट निर्मित उत्पादनाची प्रशंसा केली. तहसीलदार बाळासाहेब तेळे व गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.