बावनथडी प्रकल्पाचे काम कालबद्ध वेळेत पूर्ण करा
By Admin | Published: September 13, 2015 12:34 AM2015-09-13T00:34:55+5:302015-09-13T00:34:55+5:30
राज्यातील खोळंबलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन आवश्यक निधीची उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्पाच्या निरिक्षणाकरिता अंदाज समितीला पाठविले.
समितीने घेतला आढावा : बावनथडी संघर्ष समितीने अंदाज समितीला सोपविले निवेदन
तुमसर : राज्यातील खोळंबलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन आवश्यक निधीची उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्पाच्या निरिक्षणाकरिता अंदाज समितीला पाठविले. यावेळी बावनथडी संघर्ष समितीच्यावतीने समितीचे स्वागत करून बावनथडीचे काम कालबद्ध वेळेत पुर्ण करण्यासंबंधी निवेदन दिले.
धरणात साठविलेल्या पाण्याचा साठा १०० टक्के क्षमतेपर्यंत होईल या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करावी, बावनथडी प्रकल्पामुळे अंदाजे १७,००० हेक्टर भूमीसिंचनाची अपेक्षा असून त्याकरिता १,००० आऊटलेट गरज असून उपवितरीकेची तात्काळ निर्मिती करणे, विस्थापितांचे १०० टक्के पुनवर्सन व सोयी सुविधासह जमिनीचा मोबदला देण्यात यावा. तसेच प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या भिती २५ ते ३० वर्ष जुनाट असून कालव्यात जंगली रोपट्यांची लागवड झाली. त्यावरील जीर्ण पुलांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, मुख्य कालव्यातून तुमसर तालुक्यातील खापा, मांगली, सुकळी, मांढळ, देव्हाडी, सिवनी, कोष्टी, बाम्हणी इत्यादी गावातातील अंतिम टोकापर्यंत पाणी पोहचत नाही त्यात तांत्रिक दृष्ट्या उपवितरिकेचे निर्माण झाले नसल्याने व आवश्यक उतार मिळत नसल्याने पाणी पोहचत नाही त्या करिता उपाययोजना करावी, बावनथडी प्रकल्पाचे कार्यालय गोंदिया येथे आहे. वास्तविक पाहता प्रकल्पापासून १२५ कि.मी. अंतरावर कार्यालय असल्याने आवश्यक कामे करण्यासाठी जास्त वेळ व पैसा खर्च होत असल्यामुळे कामांत दिरंगाई होत आली असून प्रकल्पाची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. पुर्वी चार उपअभियंता कार्यालये होती आता दोन उपअभियंता कार्यालये शिल्लक असून अधिकारी नाही.
परिणामी प्रकल्पाच्या कामात अडथळा होत आहे. गोंदिया येथील कार्यालयाचे तुमसरात स्थलांतर करावे, आवश्यकतेप्रमाणे शाखा कार्यालयाची स्थापना करून कालबद्ध वेळेत बावनथडी प्रकल्प पुर्णत्वास आणण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तारीक कुरैशी, सचिव टाटा लांजेवार यांनी अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतेकर यांना केली. (शहर प्रतिनिधी)